नवरात्रोत्सवातील उपवास आणि प्रसादासाठी मागणी वाढल्याने फळांच्या किमतीमध्ये वाढ दिसून येत आहे. सफरचंद, मोसंबी, चिकू, डाळिंब या प्रसादासाठी वापरल्या जाणाऱ्या फळांमध्ये प्रतिकिलो २५ ते ३० रुपयांची वाढ झाली आहे. केळींचा दरही प्रतिडझन १० रुपयांनी वाढला आहे. दसरा होईपर्यंत हीच परिस्थिती राहील, असे एका विक्रेत्याने सांगितले. नवरात्रीमध्ये उपवासाच्या दिवशी प्रामुख्याने फलाहार करण्यात येत असल्याने फळांना मागणी वाढत आहे. त्यामुळे दसऱ्यापर्यंत फळांचे दर वाढते राहतील, असा अदांज आहे. ज्यांच्या घरी देवीचे घट बसतात, त्यांनी प्रसादासाठी फळांची खरेदी केल्याने किमती वाढल्या आहेत. देशी सफरचंदाचे दर प्रतिकिलोमध्ये १८० रुपये इतक्या दराने उपलब्ध आहेत. मोसंबंी व चिकूचे दर प्रतिकिलो ७० ते ८० रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. केळीचे दर प्रतिडझन ३५ ते ४० रुपयांवरून ५० ते ५५ रुपयांपर्यंत गेले आहेत. संत्रीचे दर प्रतिकिलो १५० रुपयांपर्यंत आहेत. डाळिंबाचे दर १०० ते १२० रुपये प्रतिकिलो आहेत.