प्रकल्पग्रस्त विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सिडकोकडून विद्यावेतन दिले जाते. त्यात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक खर्चानुसार वाढ करण्याची मागणी ‘डीवायएफआय’ या युवक संघटनेने केली आहे. त्यासाठी नवी मुंबईतील विद्यार्थ्यांच्या सह्य़ांची मोहीम मंगळवारपासून उरणमध्ये सुरू झाली आहे.
विद्यार्थ्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी १० वीपासून उच्च शिक्षण घेणाऱ्या, तसेच आयटीआयमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यावेतन सुरू करण्यात आलेले होते. ४०० रुपयांपासून सुरू करण्यात आलेले विद्यावेतन सध्या ७ हजारांवर पोहोचले आहे. असे असले तरी शिक्षणावरील खर्चात वाढ झाल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना आर्थिक चणचण सहन करावी लागत आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक खर्चावर आधारित विद्यावेतन देण्यात यावे अशी मागणी करीत असल्याची माहिती डीवायएफआयचे रायगड जिल्हा अध्यक्ष रवींद्र कासुकर यांनी दिली आहे.
सध्या ११ वीपासून बी.ए.बी.कॉम. व बी.एस्सी. वर्गासाठी २९९५ विद्यार्थ्यांना तर अभियांत्रिकच्या ३३५ विद्यार्थी, पदव्युत्तर १०६ विद्यार्थी, विधीच्या २६ तर आयटीआयचे शिक्षण घेणाऱ्या १३ विद्यार्थ्यांना विद्यावेतन दिले जात आहे. यामध्ये नवी मुंबईतील आयटीआय या सिडकोनेच ४० वर्षांपूर्वी सुरू केलेल्या होत्या, मात्र यामधील प्रकल्पग्रस्तांच्या वारसांची संख्या नगण्य झाली असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.