बेलापूरमध्ये १५०० पेक्षा अधिक तरुणांना अटक

उरण : रोजगार आणि शिक्षणाची संधी सर्वाना मिळावी तसेच सार्वजनिक उद्योगांची कवडीमोलाने सुरू असलेली विक्री व खासगीकरण थांबवा या प्रमुख मागण्यांसाठी उरणमधून डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय) या संघटनेने काढलेला ‘यूथ मार्च’ सलग तिसऱ्या दिवशी बेलापूर येथे नवी मुंबई पोलिसांनी रोखून धरला.

तरुणांनी यावेळी पोलिसांशी झटापट केली. त्यानंतर दीड हजारांहून अधिक जणांना अटक करून नवी मुंबईतील विविध पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. १६ ते १९ फेब्रुवारी असा हा युथ मार्च काढण्यात येऊन उरण ते चैत्यभूमी दादर येथे नेण्यात येणार होता. मात्र पहिल्या दिवसापासूनच पोलिसांकडून या मार्चला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. त्यामुळे पहिल्या दिवशी उरणमध्ये तर दुसऱ्या दिवशी वहाळ येथे मोर्चेकऱ्यांना  पोलिसांनी ताब्यात घेतले.

मंगळवारी हा मार्च बेलापूर येथून पुन्हा काढण्याचा प्रयत्न केल्याने नवी मुंबई पोलिसांनी मार्च काढण्यास मज्जाव करीत युवकांना ताब्यात घेतले.  ‘घोषित केल्यानुसार मार्च काढून त्याची सांगता ही चैत्यभूमी दादर येथेच करणार असून यामध्ये कितीही अडथळे आणण्याचा प्रयत्न केला तरी आपला निर्धार कायम असल्याचे मत डीवायएफयाचे राज्य अध्यक्ष सुनील धनवा यांनी व्यक्त केले.  तर आपल्या मागण्यांसाठी लोकशाही मार्गाने काढण्यात येणाऱ्या मार्चला अडविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा निषेध  मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या माजी खासदार सुभाषिनी अली यांनी केला.पोलिसांनी अली यांनाही अटक केली.