नाणेपेटय़ा चोरीला गेल्यानंतर पालिकेचा निर्णय; गैरप्रकारांनाही चाप लावणार

नवी मुंबई महानगरपालिकेने ठाणे-बेलापूर मार्गावर मोठा गाजावाजा करीत ई-टॉयलेट उभारली, मात्र ती सोयींपेक्षा गैरसोयी आणि गैरप्रकारांमुळेच अधिक चर्चेत राहिली. बिघडलेल्या किंवा चोरीला गेलेल्या नाणेपेटय़ा, सुटे पैसे नसणे, गर्दुल्ल्यांचा वावर यामुळे या शौचालयांचा फायदा फारसा होत नसे. आता मात्र पालिकेने ही सुविधा विनामूल्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय येथील गैरप्रकारांनाही चाप लावण्यात येणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत लाखो रुपये खर्च करून ठाणे-बेलापूर मार्गावर ९ ठिकाणी ई-टॉयलेट्स उभारली. तेथील नाणेपेटीत १, २ किंवा ५ रुपयाचे नाणे टाकून त्यांचा वापर करता येत असे, मात्र येथील पाणी आणि वीज रात्री बंद केली जात असे. त्यामुळे ही शौचालये निरुपयोगी ठरत. ई-टॉयलेटची स्वच्छता हा देखील अनेकदा वादाचा विषय ठरत असे.

अनेकदा नाणे टाकूनही दरवाजा उघडत नसे. तर काही ठिकाणी नाणे न टाकतादेखील दरवाजा उघडला जात असे. एका शौचालयावर सुमारे १० लाख रुपये खर्च करण्यात आला होता. प्रत्येक शौचालयाच्या सफाई आणि डागडुजीचा मासिक खर्च ३ ते ४ हजार रुपये आहे. या शौचालयांतील नाणेपेटय़ा अनेकदा गर्दुल्ले तोडून टाकत. काही वेळा सुटे पैसे नसल्यामुळे या शौचालयांचा वापर करता येत नसे. ही समस्या सोडवण्यासाठी आता ही सेवा विनामूल्य देण्यात येणार आहे.

सुविधा कुठे?

पावणे उड्डाणपूल, महापे स्कॉयवॉकजवळ, एमआयडीसी कार्यालयाजवळ, रिलायन्स कंपनीजवळ, तळवली नाका, रबाळे पोलीस ठाण्याजवळ, सिमेन्स कंपनी व उरण जंक्शन या ठिकाणी ई-टॉयलेट्स बसवण्यात आली.

ई-टॉयलेटमधील नाणेपेटय़ा समाजकंटक तोडून टाकत. अनेकदा ही शौचालये पेटीत नाणे न टाकताही उघडत. त्यामुळे आता ई- टॉयलेटची सुविधा विनामूल्य देण्याचे निर्णय घेण्यात आला आहे. ई-टॉयलेटमधील गैरप्रकारांची देखील पाहणी करण्यात येईल. ठाणे-बेलापूर मार्गावरील प्रवाशांनी त्यांचा वापर करावा.

– तुषार पवार, उपआयुक्त, घनकचरा व्यवस्थापन, नमुंमपा