उरण मध्ये जीवदान दिलेल्या घारीला कुटुंबाचा लळा

‘घार हिंडते आकाशी, तिचे चित्त पिलांपाशी’ असे अपार ममतेचे हे वर्णन सध्या उरणमध्ये प्रत्यक्षात आले आहे. जीवदान मिळालेली घारीचे चित्त चिरनेरमधील जयवंत ठाकूर यांच्या घरापाशी स्थिरावले आहे. घारीला जंगलात सोडल्यानंतरही तिने घराकडेच धाव घेतली आहे. त्यामुळे ठाकूर कुटुंबीय आणि घार यांच्यात वेगळेच नाते तयार झाले आहे.
उरण तालुक्यातील चिरनेरच्या जयवंत ठाकूर या पक्षी प्रेमीला जेएनपीटीच्या आयसीडी विभागात घरटे तुटल्याने दोन घारीची लहान पिल्ले मिळालेली होती. सहा महिन्यांपूर्वी मिळालेल्या या दोन पिल्लांपैकी एक पिल्लाचा मृत्यू झाला, तर दुसरे पिल्लू स्वत:हून झेपावू लागल्याने तिला जंगलात सोडण्यात आले होते; मात्र सकाळी सोडलेले घारीचे पिल्लू लागलीच जंगलातून परत येऊन ठाकूर यांच्या घराच्या छपरावरच स्थानापन्न होत आहे.
पेंटिंग करणाऱ्या ठाकूर यांना पक्षी आणि प्राण्याची ओढ आहे. त्यासाठी त्यांनी मित्रांच्या साहाय्याने ‘फ्रेन्डस ऑफ नेचर’ ही निसर्ग प्रेमी संघटना स्थापन केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून पक्षी आणि प्राण्याच्या, तसेच निसर्गाच्या संरक्षणासाठी विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. अनेकदा घरात घरटे नसलेल्या पक्ष्यांना प्राण्यांना, जखमी सापांना घरी ठेवून त्यांना लागणारे अन्न पुरविण्याचे काम त्याचे कुटुंब करीत आहे. घारीला सहा महिन्यांपासून रोज ५० रुपयांचे मांस देण्यात येत आहे. सोनारी येथील महामार्गावर धडक लागून एक घार जबर जखमी झाली होती. तिच्यावरही उपचार करून तिला सोडण्यात आलेले होते. त्याचप्रमाणे तालुक्यात नागरी वस्तीत आलेल्या सापांना वाचविण्यासाठी संस्थेने सहकाऱ्यांचे जाळे विणले आहे.
अनेकदा कोणाला सर्पदंश झाल्यानंतर लगेचच रुग्णाला सर्वतोपरी सहकार्य करून त्याच्यावर उपचार करण्यासाठी ठाकूर हे हजर राहतात. त्यांनी जंगलातील पक्षी आणि प्राण्यासाठी टाकावू वस्तू, भांडी यामध्ये पाणी ठेवून पक्ष्यांचे उकाडय़ापासून संरक्षण करण्याचीही जबाबदारी स्वीकारलेली आहे. या पक्षीप्रेमी तरुणांने अनेकदा आपला जीव धोक्यात घालून सापांचे प्राण वाचविले आहेत.