उरणच्या करळ फाटय़ावर सुसाट वेगाने जाणाऱ्या डंपरच्या धडकेत जखमी झालेल्या घारीवर चिरनेर येथील निसर्गमित्राकडून उपचार सुरू आहेत.
उरण परिसरात सध्या घारींचे प्रमाण खूप वाढलेले आहे. यापैकी एक घार नुकतीच करळ फाटय़ाजवळ वेगाने जाणाऱ्या डंपरला धडकली व तिच्या पायाला मोठी जखम झाली. या अपघातामुळे तिला धक्का बसला असून वन्यजीवांनाही हृदयविकाराचा धोका संभवू शकतो, असे फ्रेन्डस ऑफ नेचरचे अध्यक्ष जयवंत ठाकूर यांनी सांगितले. जयवंत हे तिच्यावर उपचार करीत असून एका काळोख्या ठिकाणी तिला ठेवण्यात आले आहे. या घारीला दररोज हाताने भरविण्याचे कामही ते करीत आहेत. अनेक विषारी, बिनविषारी प्राणी, पक्ष्यांना ठाकूर यांनी आजवर जीवदान दिले आहे.

दामूनगर झोपडपट्टीला मदत
पनवेल – मुंबईच्या कांदिवली परिसरातील दामूनगर वस्तीतील लोकांना पनवेल येथील शेतकरी कामगार पक्षाने अन्नाची मदत केली आहे. दोन लाख रुपयांचे अन्न वाहनांनी दामूनगर वस्तीत पाठविण्यात आले होते. शेकापने यापूर्वी उस्मानाबाद, मराठवाडा या जिल्ह्य़ातील दुष्काळग्रस्तांना मदत केली आहे.