21 November 2019

News Flash

नवी मुंबईत आजपासून पर्यावरण पूरक ‘ई बाइक’

गुरुवारपासून या योजनेला सुरुवात होणार असून प्रथम नेरुळ व सीवूड्स परिसरातच त्या ठेवल्या जाणार आहेत.

दहा मिनिटांसाठी २० रुपये; नेरुळ विभागात शुभारंभ

नवी मुंबई: शहराअंतर्गत वाहतुकीसाठी ‘जनसायकल’ योजना आणल्यानंतर आता पालिका प्रशासनाने बंगळूरु शहराच्या धर्तीवर नवी मुंबईत भाडेतत्त्वावर पर्यावरणपूक ‘ई बाइक’ ही दुसरी महत्त्वपूर्ण योजना आणली आहे. ‘युलू’ सायकलप्रमाणेच अ‍ॅपवर ती भाडय़ाने घेता येणार असून पहिल्या दहा मिनिटांसाठी २० रुपये आकारले जाणार आहेत. १८ वर्षांखालील मुलांना याचा वापर करता येणार नाही. गुरुवारपासून या योजनेला सुरुवात होणार असून प्रथम नेरुळ व सीवूड्स परिसरातच त्या ठेवल्या जाणार आहेत. त्यासाठी  शहरातील आठ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

नवी मुंबई शहरात दळणवळणाच्या जास्तीत चांगल्या सुविधा देण्याबरोबरच नागरिकांच्या तंदुरुस्तीसाठी नवनवीन योजना पालिका आखत आहे. १ नोव्हेंबरपासून राबवलेल्या ‘युलू’ सायकल प्रणालीला नवी मुंबईकरांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. याचा विस्तारही करण्यात आला असून, आता कोपरखरणे येथील निसर्ग उद्यान तसेच ऐरोली सेक्टर १५ येथील ‘जॉगिंग ट्रॅक’ येथेही सायकल उपलब्ध करून दिल्या आहेत.  आता याच धर्तीवर ‘ई बाईक’ ही योजना पालिकेने आणली आहे. सध्या देशात फक्त बंगळूरु या शहरात हा प्रयोग सुरू असून, त्यानंतर नवी मुंबईत होत आहे. शहरात मोठय़ा प्रमाणात तरुणाईकडून दुचाकी वाहनांचा वापर करण्यात येत आहे. मात्र यामुळे पर्यावरणाचा प्रश्न निर्माण होत आहे. ‘ई बाईक’मुळे प्रदूषणालाही आळा बसणार आहे. या बाईकचा वेग प्रतितासाला २५ किलोमीटर असणार आहे. त्यामुळे भरधाव चालविता येणार नाहीत. पेट्रालचा वापर होणार नाही कारण त्या चार्जिंगवर चालणार आहेत. एकदा चार्ज केल्यानंतर ५० ते ५५किलोमीटर एवढे अंतर त्या कापू शकतील. महत्त्वाची अट म्हणजे त्या १८ वर्षांखालील मुलांना चालविता येणार नाहीत. असे कोणी आढळल्यास १० हजारांचा दंड आकारला जाणार असून, ज्या वापरकर्त्यांच्या अ‍ॅपवर ती चालवली जाईल त्याला अ‍ॅपमधून ‘ब्लॉक’ केले जाणार आहे.

नेरुळ, सीवूड रेल्वेस्थानक, एनआरआय कॉम्प्लेक्स, पामबीच डॉमिनोज नेरुळ, करावेनगर बसस्थानक, ईस्टर्न गॅलरी, ज्वेल ऑफ नवी मुंबई, महापालिका मुख्यालय या ठिकाणी ती उपलब्ध असणार आहे.

कसा होणार वापर

‘युलू’ अ‍ॅपवरच निश्चित केलेल्या थांब्यांवर ‘ई बाईक’ उपलब्ध होणार आहे. सायकलसाठी १०० रुपये अनामत रक्कम असून ‘ई बाईक’ला १५० रुपये असणार आहे. २५० रुपये अनामत रक्कम भरून सायकल व बाईक दोन्हींचा वापर करता येऊ शकतो. ‘ई बाइक’साठी पहिल्या १० मिनिटांसाठी २० रुपये व त्यानंतर प्रत्येक १० मिनिटासाठी १० रुपये आकारले जाणार आहेत.

जीपाएसमुळे चोरीचा धोका नाही

चोरीला जाऊ  नये यासाठी सायकल व बाइकला जीपाएस लावले आहे. कोठे गाडी जात आहे याची संपूर्ण माहिती संबंधित कंपनीला मिळते. त्यामुळे तत्काळ याचा शोध लागतो. वारंवार जर एखाद्या व्यक्तीकडून चुकीचा वापर होत आहे असे दिसल्यास त्याला ‘ब्लॉक’ केले जाणार आहे.

‘युलू’ सायकल प्रणालीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. गुरुवारपासून‘ई बाईक’चा शुभारंभ करण्यात येणार आहे. नवी मुंबई देशातील दुसरे, तर महाराष्ट्रातले पहिले शहर ठरणार आहे. त्यामुळे पर्यावरणपूरक ‘ई बाईक’लाही चांगला प्रतिसाद मिळेल.

-दीपक शर्मा, युलू सायकल

First Published on July 4, 2019 2:58 am

Web Title: eco friendly e bike in navi mumbai zws 70
Just Now!
X