News Flash

लाकडी, कापडी मखर बाजारात

गणेशोत्सव काही दिवसांवर आला असून मखर, सजावट व पूजेच्या साहित्याने बाजारपेठा फुलल्या आहेत.

गणेशभक्तांकडूनही पर्यावरणपूरक सजावटीच्या साहित्याला मागणी

पूनम धनावडे, नवी मुंबई

गणेशोत्सव काही दिवसांवर आला असून मखर, सजावट व पूजेच्या साहित्याने बाजारपेठा फुलल्या आहेत. शनिवार, रविवारी साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती. थर्माकोल बंदी असल्याने आता कापडी मखरांबरोबर लाकडी मखरही बाजारात आले असून विविध रंगसंगती व नक्षीकामांमुळे ते ग्राहकांना आकर्षित करीत आहेत.

घरगुती गणपतींसाठी आकर्षक मूर्तीबरोबर सजावट व विद्युत रोषणाईवर गणेशभक्त विशेष भर देत असतात. त्यात मखराला प्राधान्य दिले जाते. थर्माकोलचे अनेक प्रकारातील मखर यापूर्वी बाजारात मिळत असत. मात्र, गेल्या वर्षीपासून थर्माकोल मखरावर बंदी घालण्यात आली आहे. मागील वर्षी कापडी मखर अधिक प्रमाणात उपलब्ध होते. आता लाकडी प्लायवूड व त्यावर कापडी आवरण असलेले मखर आले आहेत. त्याचबरोबर लोखंडी स्टँड व त्यावर कापडी फुलांची सजावट असलेले मखरही आहेत. लाकडी मखर १ हजार ९०० रुपये ते १२ हजारांपर्यंत आहेत. गणेशभक्तांकडूनही या पर्यावरणपूरक मखरांना मागणी आहे.

ग्रास म्याट, फ्लॉवरपॉटला पसंती

मखराबरोबर सजावटी साहित्यात कापडी फुले, ग्रास म्याट व फ्लॉवरपॉटला ग्राहक अधिक पसंती देत असल्याचे विक्रेते ए. एस. गोस्वामी यांनी सांगितले. कापडी फुलांच्या माळा ३०० ते ८०० रुपये तर ग्रास म्याट ४० ते ५० चौरस फूट व फ्लॉवरपॉट १२० रुपये ते ५०० रुपयांपर्यंत आहेत.

कोल्हापूरच्या पुराचा फटका

लाकडी व प्लायवूडचे सजावट केलेले मखर कोल्हापूर येथून बाजारात येत होते. यासाठीचे प्लायवूड हे गुजरातमधून तर कापडावर हातकाम हे कोल्हापूर येथे होत होते. आतापर्यंत शहरात ५०० नग विक्री केले असून पूरस्थितीमुळे एक ट्रक माल तेथेच अडकून राहिला असल्याचे विक्रेता सूरज राजपुरोहित यांनी सांगितले.

कापूर महागला

पूजेच्या साहित्याला अधिक मागणी असते. यात दररोज आरतीसाठी कापूर लागत असतो. मागील वर्षीपासून कापराच्या दरात वाढ झाली आहे. वस्तू व सेवाकर लागल्याने ही दरवाढ झाल्याचे विक्रेते सांगतात. आधी ४०० ते ५०० रुपये प्रतिकिलो मिळणारा कापूर आता एक हजार २०० रुपयांवर पोहोचला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 2:16 am

Web Title: eco friendly ganesh decoration market
Next Stories
1 ‘एनएमएमटी’चा तोटा दोन कोटींवर
2 गणपती आगमनापूर्वी खड्डेदुरुस्ती
3 बेकायदा जोडरस्ता घातक
Just Now!
X