४८ तासांत गुन्ह्यची उकल; पाच जण गजाआड

पनवेल : पनवेल रेल्वेस्थानक परिसरात जळालेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाची ओळख पटील असून सुरक्षारक्षकाला लुटताना मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. पुरावे नष्ट करण्याच्या हेतूने त्याच्या शरीराचे तुकडे करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पनवेल पोलिसांनी ४८ तासात गुन्ह्य़ाची उकल केली असून पाच आरोपींना गजाआड केले आहे.

घनश्याम सुंदर चंद्रकार (२२, छत्तीसगड), मलू महादेव पुजारी (२५, गुलबर्गा, कर्नाटक), विकास कारंडे (२०, पाटण, जिल्हा सातारा), मोईन बिजलाल खाटीक (२२, मध्य प्रदेश), जीतेंद्र यादव (३०, आझमगड उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, सोमवारी १८ फेब्रुवारी रोजी पनवेल रेल्वे स्थानकासमोरील मोकळ्या भूखंडाच्या झुडपात अर्धवट जळालेल्या अवस्थेतील पुरुषाचा मृतदेह सापडला होता. त्यात कमरेखालील भाग सापडला नव्हता. अज्ञात व्यक्तीने खून करून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रथमदर्शनी अंदाज पोलिसांना होता. त्यानुसार याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र याची उकल करणे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते.

पोलीस आयुक्त संजयकुमार, सहपोलीस आयुक्त सुरेश मेकला, पोलीस उपायुक्त अशोक दुधे, सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी तपास सुरू केला होता. कमरेखालील भाग नसल्याने मृतदेहाची ओळख पटविणे कठीण होते. त्यामुळे शरीराच्या दुसऱ्या भागाचा पोलीस शोध घेत होते. पोलिसांकरिता मोठे आव्हान होते.

शरीराचा दुसरा भाग शोधण्याचे काम सुरू होते. दरम्यान झाडाझुडपातून जळालेली राख सापडली. यात फोर्स वन सिक्युरिटी सव्‍‌र्हिसेस कंपनीचे अमरजीत सिंग असे नाव व फोटो असलेले ओळखपत्र हाती लागले. त्यानुसार तपासाला दिशा मिळाली. संबंधित एजन्सीकडे चौकशी केली असता हे ओळखपत्र अमरजित रामेश्वर पाल (४०, मूळ रहिवासी उत्तर प्रदेश) याचे असल्याचे समोर आले. त्यानंतर त्याच्या नातेवाइकांशी संपर्क साधल्यानंतर हा मृतदेह अमरजीत याचाच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांना याच परिसरात मयत व्यक्तीच्या कमरेखालचा भागही आढळून आला.

तपासात पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, वरील पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घतले. पोलिसी खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. सुरक्षारक्षकाला लुटत असताना केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी हे कृत्य केले.