नगरविकासमंत्र्यांचा प्रस्तावाला महाविकास आघाडीच्या नेत्यांचे अनुमोदन

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्त नेते माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी रायगड जिल्ह्य़ातील विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचा दबाव वाढत असताना नवी मुंबई विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचे शासनपातळीवर जवळजवळ निश्चित झाले आहे. नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडलेल्या या प्रस्तावाला महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अनुमोदन दिले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वाचे आभार मानलेले आहेत.

ठाकरे हे देशपातळीवरील नेते होते. त्यामुळे त्यांचे नाव आंतरराष्ट्रीय विमानतळाला देणे योग्य ठरेल असा एक मतप्रवाह तयार झाला आहे. या विमानतळाला माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांचे नाव द्यावे अशी मागणीही ‘एमआयएम’ने केली आहे. मात्र या दोन्ही नावांवर फुल्ली मारून शासनाने ठाकरे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.

नवी मुंबई विमानतळाच्या कामाला अद्याप प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. सिडकोने विमानतळ पूर्व कामे केलेली आहेत, मात्र विमानतळ उभारणाऱ्या कंपनीने आर्थिक कारणास्तव अंग काढून घेतल्याने आता नवीन बांधकाम कंपनी हे काम करणार आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच या विमानतळाच्या नावावरून वाद उफाळून आला आहे. या नियोजित विमानतळाला प्रकल्पग्रस्त नेते माजी खासदार ‘दिबा’ पाटील यांचे नाव देण्यात यावे यासाठी रायगड जिल्ह्य़ातील सर्व राजकीय नेत्यांनी आग्रह धरला असून जेएनपीटीचे विश्वस्त भूषण पाटील यांनी लाक्षणिक उपोषण पुकारले होते. पाटील यांच्या नावासाठी एकच पर्याय असून ठाकरे यांच्या नावासाठी देश राज्यात अनेक पर्याय उपलब्ध असल्याचे मत रायगडवासीयांनी व्यक्त केले आहे. यात ‘एमआयएम’ने उडी घेतली असून अंतुले यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी केली आहे. नावाचा हा वाद सुरू असतानाच राज्य सरकारने ठाकरे यांचे नाव कागदोपत्री देण्याची प्रक्रिया सुरू केली असून या आंतरराष्ट्रीय विमानतळाला आंतरारष्ट्रीय ख्यातीच्या नेत्याचे नाव देण्यावर एकमत झाले आहे. त्यामुळे रायगडवासीयांच्या भावना दुखाविण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी आपल्या वडिलांचे नाव या विमानतळाला दिल्याने आघाडीच्या नेत्यांचे आभार मानले असल्याचे सिडकोच्या एका उच्च अधिकाऱ्याने सांगितले.