कोकण पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या पुढील महिन्यात होणाऱ्या निवडणुकीची आचारसंहिता गुरुवारपासून संपूर्ण जिल्ह्य़ात लागू करण्यात आली असून त्याचा पहिला फटका नवी मुंबई महापालिकेच्या शुक्रवारी होणाऱ्या स्थायी समिती बैठकीला बसला आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्याने सर्वसाधारण सभेत नागरी कामांचे प्रस्ताव मंजूर केले जात नाहीत. त्यामुळे महत्त्वाचे प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून घ्यावे लागत आहेत. त्यात आचारसंहिता लागू झाल्याने दुष्काळात तेरावा महिना आल्याचे चित्र आहे.

कोकण पदवीधर व शिक्षक मतदारसंघाची निवडणूक ३ फेब्रुवारीला होणार आहे. त्यामुळे ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात निवडणूक आयोगाने ४ जानेवारीपासून निवडणूक आचारसंहिता लागू केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने तसे पत्र सर्व पालिका, नगरपालिका आणि स्थानिक प्राधिकरणांना देण्यात आले आहे. त्यामुळे मतदारांना आकर्षित करता येईल असे कोणतेही नागरी प्रस्ताव या काळात मंजूर केले जाणार नाहीत. त्याचा पहिला फटका नवी मुंबई पालिकेच्या स्थायी समिती बैठकीला बसला असून ती रद्द झाली आहे.

दोन महिन्यांपूर्वी पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात भाजप वगळता काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीन प्रमुख पक्षांनी अविश्वास ठराव मंजूर केला आहे. त्यामुळे हे पक्ष सर्वसाधारण सभेत प्रशासनाच्या प्रस्तावांना मंजुरी देत नाहीत. स्थायी समितीत काही आर्थिक फायद्याचे प्रस्ताव येत असल्याने ही सभा दर आठवडय़ाला घेतली जात आहे. मात्र ती घेण्यासही आता पुढील महिनाभर आडकाठी आली आहे. सार्वजनिक रुग्णालयांना लागणारी औषधे, शालेय वस्तू, स्वच्छता कंत्राट, फवारणी यांसारखे १६ प्रस्ताव शासनाकडून मंजूर करून घेतले आहेत.