|| विकास महाडिक

सुट्टीत गावी गेलेले हक्काचे मतदार परतणार

नवी मुंबई : राज्यात वाढत असलेल्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीचे कारण ठरू पाहणाऱ्या निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा राज्य निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय हा अनेक उमेदवारांच्या पथ्यावर पडणारा आहे. कमीत कमी तीन महिने लांबणीवर पडलेल्या या निवडणुका आता जूनच्या शेवटच्या आठवडय़ात होण्याची शक्यता असून मुलांच्या सुट्टीत गावी गेलेले हक्काचे मतदार परतणार आहेत. तसेच कडाक्याच्या उन्हाळ्यात करावा लागणाऱ्या प्रचारापासून उमेदवारांची सुटका झाली आहे. करोना प्रसारामुळे राज्यातील      स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका स्थगित करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे गेली तीन महिने इच्छुक उमेदवारांनी केलेली पेरणी पाण्यात गेलेली आहे. यात हजारपेक्षा जास्त उमेदवारांनी केलेल्या निवडणूक प्रचारावर कोटय़वधी रुपये खर्च झालेले आहेत. निवडणूक लांबणीवर पडल्याने या उमेदवारांचा हा खर्च पाण्यात गेलेले असताना काही उमेदवार मात्र खूश आहेत.

सर्वसाधारणपणे एप्रिलच्या तिसऱ्या आठवडय़ात होणाऱ्या या निवडणूक काळात हजारो मतदारांना गावी जाण्याचे वेध लागतात. अनेक विद्यार्थ्यांची एप्रिल माध्यान्हापर्यंत परीक्षा संपणार आहेत. त्यामुळे उत्तर व पश्चिम महाराष्ट्रात होणाऱ्या जत्रांचा योग साधून अनेक मतदार गावी जाण्याचे आरक्षण करीत असल्याचे दिसून येते. हक्काचा मतदार गावी गेला की उमेदवारांची चिंता वाढत असल्याचे दिसून येते.

नवी मुंबईत मोठय़ा प्रमाणात असणारा माथाडी कामगार आपल्या सर्व कुटुंबाला गावी पाठविण्याचे बेत गावच्या जत्रेपासून आखत असल्याचे समजते. त्यामुळे आता गावी जाऊन आलेला मतदार उमेदवारांना मिळणार आहे. काही उमेदवारांची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याने ही चिंता मिटली आहे. सध्या कडाक्याचे उन्हा पडू लागले असून दिवसेंदिवस वातावरणाचे तापमान वाढत आहे. सोलापूरमध्ये मंगळवारी ३७ सेल्सिअंश तापमान नोंदविले गेले आहे.

नवी मुंबईतही अंगाची काहिली होणारे उन्ह पडू लागले आहे. या कडाक्याच्या उन्हात प्रचार करणे उमेदवारांना त्रासदायक होते. उन्हामुळे कार्यकर्त्यांचा उत्साहदेखील कमी होता. निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने हा प्रचाराचा तडका वाचला आहे. त्यामुळे बरे झालं, निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या अशी एक प्रतिक्रिया उमेदवारांची आहे.

करोना संकटाचा सामना करण्यासाठी ह्य़ा निवडणुका पुढे ढकलणे आवश्यक होते. या काळात करोनाबद्दल जनजागृती करतानाचा आम्हाला प्रचाराला अधिक वेळ मिळणार आहे. त्याचप्रमाणे गावी गेलेले आमचे मतदार माघारी परततील तसेच प्रचार करताना कडाक्याच्या उन्हापासून सुटका झाली.

-रेहाना इरफान पटेल, इच्छुक उमेदवार, खैरणे गाव

करोनाच्या संकटापेक्षा निवडणुका महत्त्वाच्या नाहीत, पण करोनाच्या भीतीमुळे शहरी रहिवाशांनी अगोदरच गाव गाठलं आहे. त्यामुळे हे मतदार आता पुन्हा शहरात येण्यास काही काळ घेणार आहेत. त्यात सुटय़ा पडल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात गावी जाण्याची पद्धत आहे. प्रचारासाठी उन्हापासून सुटका झाली तरी पावसाळा त्यापेक्षा त्रासदायक आहे.

-भरत जाधव, इच्छुक उमेदवार नेरुळ सेक्टर ४८