News Flash

दुबार, तिबार नावे कमी करण्यासाठी मतदारांचा पंचनामा

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकींचे वारे वाहू लागल्याने सर्वच राजकीय पक्ष सर्तक झाले.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

|| विकास महाडिक

आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकींचे वारे वाहू लागल्याने सर्वच राजकीय पक्ष सर्तक झाले असून नव मतदार नोंदणी आणि बोगस, दुबार व तिबार नाव नोंदणी कमी करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. बेलापूर मतदारसंघातून अशी ३६ हजार दुबार व तिबार मतदारांच्या नावाची तक्रार निवडणूक आयोगाकडे देण्यात आलेली आहे. यातील ११ हजार मतदारांचा पंचनामा करण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.

आगामी निवडणुकीतील संभाव्य उमेदवार या मतदारसंघात निश्चित झाले असून राजकीय उलथापालथ न झाल्यास मागील तिरंगी लढत पुन्हा होणार आहे. त्यामुळे या तिन्ही उमेदवारांनी दुबार, तिबार आणि बोगस मतदारांची छाननी करण्याचे खास काम खासगी संस्थांना दिले आहे. यात बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी २१ हजार दुबार-तिबार आणि बोगस मतदरांची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. शिवसेनेचे विजय नाहटा यांनी हीच तक्रार १८ हजार मतदारांची केली आहे. निवडणूक आयोगाने या सर्व तक्रारींची गंभीर दखल घेतली असून बोगस, दुबार-तिबार नाव नोंदणीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यानुसार मागील आठवडय़ापासून उमेदवारांच्या तक्रारीची छाननी करून दुबार नावे असलेल्या बेलापूरमधील ११ हजार मतदारांचा पंचनामा सुरू केला आहे. एकाच मतदाराचे एकापेक्षा जास्त बूथ यादीत नाव नोंदणी आढळून आल्यास त्यांच्या प्रत्येक ठिकाणांवर जाऊन बूथनिहाय अधिकारी चौकशी करीत आहेत. त्यानंतर त्यांना कोणत्या एका ठिकाणी नाव ठेवण्याची इच्छा आहे त्याचे प्रतिज्ञापत्र लिहून घेतले जात असून इतर नाव काढून टाकण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे.

नवी मुंबईत अनेक मतदार हे वेळोवेळी भाडय़ाची घरे बदलणारे आहेत. रहिवाशांची अशी संख्या दोन लाखांच्या घरात आहे. त्यामुळे या मतदारांची नावे अनेक वेळा वेगवेगळ्या बूथ यादीत आढळून आली आहेत. याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील अनेक मतदारांची नावे ही त्यांच्या गावीपण आहेत आणि या ठिकाणी पण नोंदविण्यात आलेली आहेत.

नवी मुंबईतील अनेक रहिवासी हे फ्लोटिंग आहेत. त्यामुळे त्यांची अनेक ठिकाणी नाव नोंदणी झालेली आढळून येत असून त्यांना दुबार अथवा तिबार नाव नोंदणी म्हणतात. या मतदारांची सर्व चौकशी करून पंचनामे केले जात आहेत. त्यांची दुसरी नावे वगळण्यात येणार आहेत. बेलापूर मतदारसंघात ही संख्या ११ हजारांच्या घरात आहे.     एन. एस. सगट, निवडणूक नायब तहसीलदार, ठाणे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 19, 2018 1:37 am

Web Title: elections in navi mumbai
Next Stories
1 फेरीवाल्यांचे रस्त्यांवरही अतिक्रमण
2 विहिरींचे पाणी खारट?
3 गतिरोधकांचाच धोका
Just Now!
X