केंद्र सरकारच्या ‘फेम’ योजनेअंतर्गत १३० विद्युत बस नवी मुंबई महापालिकेने घेण्याचा निर्णय घेतला असून यातील ‘फेम १’ अंतर्गत ३० बसपैकी १५ बस एनएमएमटीच्या ताफ्यात आल्या आहेत. यातील दहा बसना प्रादेशिक परिवहनकडून क्रमांक मिळाले असून पाच बसची प्रक्रिया सुरू आहे. या पंधरा बस पहिल्या टप्प्यात सुरू करण्याची नवी मुंबई परिवहन उपक्रमाने तयारी सुरू केली आहे. प्रायोगिक तत्त्वावर एका मार्गावर या बस सुरू करण्याचे नियोजन सुरू आहे.

‘बेस्ट’ तिकीट दरकपातीमुळे एनएमएमटीच्या तोटय़ात भर पडली आहे. ही भरून काढण्यासाठी चांगली सेवा एनएमएमटीला द्यावी लागणार आहे. या विद्युत बसचा यासाठी उपयोग होणार असून इंधनावरील खर्चही यामुळे कमी होईल.

केंद शासनाच्या अवजड उद्योग मंत्रालयाने ‘फेम १’ योजनेअंतर्गत ३० बस मिळाव्यात यासाठी नवी मुंबई परिवहन उपक्रमाने केंद्राकडे मागणी केली होती. केंद्राने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर नवी मुंबई परिवहन समितीने या अनुदानातील बसखरेदीचा प्रस्ताव मंजूर केला होता. त्यानुसार या विद्युत बस येण्यास सुरुवात झाली आहे. या ३० पैकी १५ बस एनएनएमटीच्या ताफ्यात आल्या आहेत. यातील दहा बसला प्रादेशिक परिवहनकडून क्रमांकही मिळाले आहेत. उर्वरित पाच बसना क्रमांक मिळविण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. त्याचप्रमाणे आणखी १०० विद्युत बस खरेदी करण्याचा निर्णय परिवहन उपक्रमाने घेतला आहे. तो केंद्राकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात या पंधरा बस सुरू करण्याचे नवी मुंबई परिवहनचे नियोजन सुरू झाले आहे. विद्युत बससाठी प्रथम तुर्भे येथे दोन चार्जिंग स्टेशन तयार करण्यात आली असून भविष्यात शहरातील विविध ठिकाणी एनएमएमटीकडून स्टेशन उभारली जाणार आहेत. प्रदूषणालाही आळा बसणार आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार या बस सुरू करण्यात येतील, असे महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले.

इंधन खर्च कमी होणार

सध्या एक किलोमीटर बसेस चालवण्यासाठी इंधनापोटी ३० रुपये खर्च येत आहे. विद्युत बससाठी प्रतिकिलोमीटर १६ रुपये खर्च येणार आहे. परिवहन उपक्रमाकडे ४८५ बस असून यात ३० विद्युत बसची भर पडणार आहे. या बस एकदा चार्जिंग केल्यानंतर अंदाजे १५० किलोमीटर धावते. त्यामुळे इंधनापोटी येणारा खर्च कमी होणार आहे.