बसखरेदी व चार्जिग केंद्र उभारणीप्रस्तावाला महासभेची मंजुरी

नवी मुंबई परिवहन उपक्रमात केंद शासनाच्या ‘फेम १’ अंतर्गत घेण्यात आलेल्या ३० विद्युत बसपैकी १० बस आल्या असून आता ‘फेम २’ अंतर्गत १०० बस खरेदी करण्यात येणार आहेत. यासाठीचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी देण्यात आला असून यासाठी चार्जिग केंद्रही उभारण्यात येणार आहेत.

केंद्र शासनाने या आधीच नवी मुंबई महापालिकेला ३० विद्युत बस खरेदीसाठी २७ जुलै रोजी २०१८ रोजी अनुदान मंजूर केले आहे. त्याप्रमाणे दहा बस एनएमएमटीच्या उपक्रमात आल्या आहेत. नव्या प्रस्तावानुसार शंभर बस पुढील काळात येतील. म्हणजे शहरात १३० विद्युत बस धावणार आहेत.

केंद्र शासनाच्या उद्योग मंत्रालयाने ‘फेम २’ अंतर्गत अनुदान योजना सुरू केली आहे. त्यानुसार १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरासाठी १०० बसचा प्रस्ताव पाठवणे आवश्यक होते. त्यानुसार महापालिकेने २०० विद्युत बसचा प्रस्ताव शासनाला १ जुलै २०१९ ला सादर केला होता.

केंद्र शासनाने नवी मुंबई महापालिकेला १०० विद्युत बसच्या प्रस्तावाला २० ऑगस्ट २०१९ रोजीच मंजुरी दिली आहे. त्यामध्ये १० ते १२ मीटर लांबीच्या ७० बस, तर ८ ते १० मीटर लांबीच्या ३० बसला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार महापालिकेने चार्जिंग केंद्र उभारणे व १०० बस खरेदी करणे याबाबतच्या प्रस्तावाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता परिवहन उपक्रमासाठीच्या १०० विद्युत बसेससाठी निविदा प्रक्रिया राबविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

केंद्र सरकारने १२ आठवडय़ात प्रस्ताव मंजूर करण्याची अट घातली होती. त्यामुळे आचारसंहितेपूर्वी या प्रस्तावाला मंजुरी घेण्यात आली आहे.१६० कोटींचा खर्च एका १२ मीटर बसची अंदाजित किंमत १ कोटी ७५ लाख असून ९ मीटरच्या बसची किंमत १ कोटी २५ लाख रुपये असणार आहे. त्यामुळे १०० बससाठी एकूण १६० कोटी लागणार असून केंद्रशासन ५२ कोटी, तर कंत्राटदाराला १०८ कोटी उभे करावे लागणार आहेत.

या पर्यावरणपूरक बसमुळे पालिका परिवहन उपक्रमाला निश्चित लाभ होईल व शहराच्या पर्यावरणाच्या दृष्टीने या बस अत्यंत महत्त्वाच्या आहेत. पालिकेला केंद्राचे अनुदान व ठेकेदारकडून बसखरेदी व परिचलनामुळे महापालिकेला खर्च करावा लागणार नाही. -अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त, नवी मुंबई महापालिका