दरवर्षी शांततेत आणि निर्विघ्न पार पडणाऱ्या नवी मुंबईतील गणेश विसर्जन मिरवणुकीला गुरुवारी सीवूड्स येथे घडलेल्या दुर्घटनेने गालबोट लावले. सीवूड्स येथील एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची उंच मूर्ती विसर्जनासाठी दारावे तलाव येथे नेण्यात येत असताना मूर्तीच्या मागे असलेल्या लाकडी प्रभावळीचा रस्त्यावर लोंबकळणाऱ्या उच्चदाबाच्या वीजवाहिनीशी संपर्क येऊन शॉर्ट सर्किट झाले. या घटनेत सात भाविक जखमी झाले.

आशीष पारकर, प्रसाद पिसे, श्याम झावरे, हरिश्चंद्र फाळके आणि योगेश निकम यांचा समावेश असून अन्य दोघे किरकोळ जखमी आहेत. याबाबत अद्याप कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, अशी माहिती नेरुळ पोलिसांनी दिली.

सीवूड्स सेक्टर ४८ येथील राजे शिवछत्रपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती ‘सीवूड्सचा महाराजा’ म्हणून ओळखला जातो. या गणेशाची विसर्जन मिरवणूक गुरुवारी मध्यरात्री सीवूड्स हावरे मॉलजवळच्या चौकात आली असता रस्त्याच्या वरून गेलेल्या उच्चदाबाच्या वीजवाहिनीला मूर्तीच्या मागील प्रभावळीचा स्पर्श झाला. ही प्रभावळ बांबू व लोखंडाच्या साह्यने बनवण्यात आली असल्याने तिने पेट घेतला व त्याचवेळी वाहिनीतील वीजप्रवाह झपाटय़ाने खाली उतरला. यावेळी गणेशमूर्ती वाहून नेणारा गाडा ढकलणाऱ्या कार्यकर्त्यांना जोरदार धक्का बसला व यातील काहीजण जागीच बेशुद्ध पडले, अशी माहिती मंडळाचे सदस्य विशाल विचारे यांनी दिली.  विजेचा धक्का बसलेल्या कार्यकर्त्यांच्या शरीरावर मोठे व्रण उमटले असल्याची माहिती एका जखमीच्या निकटवर्तीयाने दिली. सात जखमींपैकी दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. मात्र, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. तर अन्य जखमींना उपचारानंतर घरी सोडण्यात आले.

उंच गणेशमूर्तीचा प्रश्न ऐरणीवर

‘सीवूड्सचा महाराजा’ मंडळाची गणेशमूर्ती १८ फुटांची होती, तर ज्या हातगाडीवर मूर्ती घेऊन जात होते त्याची उंची सुमारे दीड ते अडीच फूट होती. त्यामुळे या मूर्तीच्या प्रभावळीचा वीजवाहिनीला स्पर्श होऊन ही दुर्घटना घडली. या पाश्र्वभूमीवर उंच गणेशमूर्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, दारावे परिसरातील रस्त्यांवर लटकणाऱ्या उच्चदाबाच्या वीजवाहिन्यांबाबतही नाराजी व्यक्त होऊ लागली आहे. मात्र, वीजवाहिनी नियमाप्रमाणे २० फूट उंचीवर असल्याचा दावा महावितरणाच्या जनसंपर्क अधिकारी ममता पांडे यांनी केला आहे.