करोनाकाळात तीनशे ते चारशे रुपयांची वाढ

नवी मुंबई : करोनाकाळात शहरांतील वीज ग्राहकांच्या तक्रारीत वाढ झाल्याचे दिसत आहे. अगोदर महिन्याला १४०० पर्यंत येणारे वीज देयक आता गेल्या वर्षभरापासून तेवढीच वीज वापरून १७०० ते २००० हजारांपर्यंत येत आहे. याबाबत तक्रार केली असता कोणही दखल घेत नसल्याचे अनेक ग्राहकांचे म्हणणे आहे.

वीज देयक वसुलीत नवी मुंबई राज्यात अव्वल आहे. वीजचोरीही राज्याच्या मानाने शहरात अत्यल्प आहे. असे असले तरी करोना काळापासून वीज ग्राहकांच्या तक्रारींत वाढ झाल्याचे दिसत आहे. करोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, धंदे बंद आहेत, तर रोजंदारीही बंद असल्याने सर्वाचीच आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. त्यात वाढीव वीज देयके येत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

अनेक ग्राहकांना वेळेवर देयक न भरल्याने वीज खंडित करण्यात येत आहे, यावेळी कर्मचाऱ्यांशी वाद होत आहेत. त्यात भरमसाट वीज देयकाची दखल घेतली जात नसल्याची खंत नेरुळ येथील वीजग्राहक संजय भांबरे यांनी व्यक्त केली आहे. करोनाकाळात वीज देयकांबाबत तक्रारींत वाढ झाल्याची माहिती वितरण विभागातीलच एका अधिकाऱ्याने नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर दिली.

याबाबत महावितरणचे उपभियंता यांना विचारणा केली असता तुम्ही कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधावा असे सांगण्यात आले. कार्यकारी अभियंता यांना संपर्क केला असता मी बाहेर आहे, नंतर बोलतो असे सांगण्यात आले.

स्कॅनरबाबत तक्रारी

वीज देयक ऑनलाइन भरता यावे यासाठी वीज देयकांवर उजव्या बाजूला स्कॅन कोड देण्यात आलेला आहे. मात्र अंतिम मुदत पूर्व यावर स्कॅन केले असता देयक अंतिम तारखेनंतर दिलेल्या दंड आकारणीसह असलेले देयक वसूल होत असल्याचा अनुभव अनेक ग्राहकांना येत आहे. याबाबत महावितरणच्या भांडुप कार्यालयाशी संपर्क केला असता स्कॅनरचे जाऊ  द्या.. गडबड आहे मान्य, तुम्ही थेट जाऊन देयक भरा असे उत्तर मिळत असल्याचे वीजग्राहक अनिल जाधव यांनी सांगितले. याबाबत वाशीतील कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क करीत तक्रार केली त्यांनी व्हाट्सअपवर देयक मागवले व मीटर तपासणीसाठी माणसे पाठवतो असे सांगितले. मात्र बारा दिवसांनंतरही कोणी आलेले नाही. आता ते अधिकारी फोनही उचलत नाहीत, असेही जाधव यांनी सांगितले.

घरात एक टीव्ही, दोन एलईडी टय़ूब, एक पंखा, एक फ्रीज, एक फिल्टर, दोन झीरो बल्ब आहेत. याचे एक महिन्याचे देयक १७०० रुपये आले आहे. हाच वापर ऐन उन्हाळ्यात होता. तरीही एप्रिलचे देयक १४०० होते. गेली अनेक महिने असे वाढीव देयक येत आहे.

– स्वाती सिंदफळकर, वीजग्राहक, कोपरखैरणे

९ ,७८,८०३ वीजग्राहक 

४१५.५७ दशलक्ष युनिट वार्षिक वीज पुरवठा देयक वसुली

९८%  उच्चदाब : ९० % कमी दाब