16 November 2019

News Flash

सलग तिसऱ्या दिवशीही वीज गायब

उन्हाळ्यात वीज समस्येने येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत.

(संग्रहित छायाचित्र)

कोपरखैरणे ते ऐरोली या भागांत सलग तिसऱ्या दिवशीही विजेचा खेळखंडोबा सुरू होता. सोमवारी कोपरखैरणेत २० तास, ऐरोलीतील काही भागांत ७ तास तर घणसोलीत ६ तास विद्युतपुरवठा खंडित होता. तुर्भे कॉलनी भागात सोमवारी रात्री अकराला खंडित झालेला वीजपुरवठा मंगळवारी सायंकाळी सातपर्यंत पूर्ववत झाला नव्हता.

उन्हाळ्यात वीज समस्येने येथील रहिवासी त्रस्त झाले आहेत. एकही दिवस गेला नाही की कुठे ना कुठे ही समस्या निर्माण झाली नाही. असे असताना महावितरण मात्र सरकारी उत्तरे देत वेळ मारून नेत आहे. मंगळवारीही ऐरोली, घणसोली, कोपरखैरणेत अधूनमधून वीज जातच होती. घणसोलीच्या मरीआई चौक व समर्थ नगर परिसरात व सेक्टर ५ व ३ आणि घणसोली गावात अनेक ठिकाणी सकाळी अकरा ते संध्याकाळी ५ पर्यंत वीजपुरवठा खंडित होता. ऐरोली सेक्टर ७, ८ आणि ८ ए येथेही सकाळी १० वाजता हीच समस्या निर्माण झाली होती. कोपरखैरणेत देखील सकाळी आठपासून दिवसभर दर काही ठिकाणी १० मिनिटे ते पाऊन तास वीज पुरवठा खंडित होता.

तुर्भे कॉलनी भागातील दक्षिणमुखी गणेश मंदिर परिसरात चाळ क्रमांक ७६ व ७७ तसेच जवळील भागात सोमवारी रात्री अकराच्या सुमारास वीजपुरवठा खंडित झाला तो मंगळवारी रात्री ७ पर्यंत पूर्ववत झाला नव्हता.

First Published on June 12, 2019 12:56 am

Web Title: electricity shortage 2