नवी मुंबई, पनवेलमध्ये वीज खंडीत

दिवसा सूर्यदेवाचा कोप आणि रात्री दमट हवामान अशा कोंडमाऱ्याने हैराण झालेल्या नवी मुंबईकरांना मंगळवारी रात्री महावितरणच्या कारभाराचाही तडाखा सहन करावा लागला. घणसोली, कळंबोली आणि पनवेल परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्याने उकाडय़ाचा त्रास सहन करावा लागला. मंगळवारी रात्री कळंबोली व पनवेल परिसरात कामासाठी वीजपुरवठा खंडित करावा लागल्याने रात्र तिष्ठत काढावी लागली. तर घणसोली विभागात रात्री वीजपुरवठा खंडित झाल्याने नागरिकांचे हाल झाले.

महावितरणच्या ढिसाळ कारभाराचा फटका सहन करावा लागत असल्याने नागरिकांनी महावितरण अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या होत्या. यात कोपरखैरणे आणि घणसोली परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात असल्याच्या तक्रारींचा समावेश होता. मंगळवारी रात्री घणसोलीकरांना वीज गेल्याने महावितरणच्या नियोजनशून्य कारभाराचा पुन्हा प्रत्यय आला. याच वेळी खांदा कॉलनी, पनवेल आणि कळंबोली परिसरात मंगळवारी महावितरणच्या कामासाठी वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. कळंबोलीत  ट्रान्सफार्मरमध्ये बिघाड झाल्याची माहिती महावितरणचे अधिकारी माणिक राठोड यांनी दिली.

वाढीव बिले

वाढीव वीजबिलावरून नवी मुंबईकरांत आधीच संताप आहे. मागील आठवडय़ात वाढीव बिले, बिलातील अतिरिक्त वीजभार आणि शहरात सातत्याने वीजपुरवठा खंडीत होण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आमदार संदीप नाईक यांनी वाशी येथे महावितरणच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या ही गोष्ट निदर्शनास आणून दिली.

तापमानात अधिक भर पडल्याने विजेची मागणी वाढली आहे. रात्रीच्या वेळी वातानुकूलित यंत्रांमुळे विजेचा मोठा वापर होत असतो. त्यामुळे मोठय़ा प्रमाणावर वीज लागते. त्यामुळे वीजपुरवठय़ात अनियमितता निर्माण होते.     – सी. मानकर, अधीक्षक अभियंता, वाशी