भार वाढल्याची महावितरणकडून सबब

रविवारी रात्री वाशी येथे तब्बल दीड तास वीजपुरवठा खंडित झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट वीज वितरण कार्यालयावर धडक दिली. ग्राहकांची गर्दी झाल्यामुळे या परिसरात मोर्चाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर तातडीने काम हाती घेत वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला.

नवी मुंबईत सध्या विद्युत वितरण व्यवस्थेचे तीनतेरा वाजले आहेत. रोजच कुठे ना कुठे वीज खंडित होत असल्याने रहिवाशांच्या रोषाला अधिकारी-कर्मचारी वर्गाला सामोरे जावे लागत आहे. विजेची मागणी वाढल्याने भार वाढतो व विद्युत पुरवठा खंडित होतो, असे मोघम उत्तर दिले जाते. त्यामुळे १०० टक्के देयक भरणाऱ्या नवी मुंबईकरांवर अन्याय का, असा प्रश्न रहिवासी करीत आहेत. कोपरखैरणेत रोजच रात्री एकदा तरी वीज खंडित होतेच. शुक्रवारी रात्री बाराच्या सुमारास सेक्टर १५ व १६ चा वीजपुरवठा खंडित झाला. अर्ध्या तासापेक्षा जास्त काळ विद्युत पुरवठा खंडित झाला होता, मात्र पुन्हा दहा ते पंधरा मिनिटांत वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर महावितरण कर्मचारी दूरध्वनीला प्रतिसाद देईनासे झाले. त्यामुळे वाशीतील कार्यालयाच्या परिसरात सुमारे ५० ग्राहक जमले. शेवटी रात्री दीडच्या सुमारास वीजपुरवठा सुरळीत झाला.

दर वर्षी पावसाळ्याच्या तोंडावर विजेची मागणी वाढते हे वितरण व्यवस्था पाहणाऱ्या अधिकाऱ्यांना माहिती नसते का? त्याबाबत आधीच सोय करणे गरजेचे आहे. मात्र दर वेळी थातुरमातुर सबबी सांगितल्या जातात.   – अभिनंदन पाटील, रहिवासी

रविवारी काही काळ भार वाढल्याने फ्यूज गेला. काही वेळाने पुन्हा तीच घटना घडली. त्यामुळे रहिवासी संतप्त झाले. सध्या त्याची पूर्ण दुरुस्ती करण्यात आली असून आम्ही सर्वत्र काळजी घेत आहोत.    – एस. आर. टेकाळे, उपअभियंता, वाशी विभाग