घारापुरीत मुख्यमंत्री, ऊर्जामत्र्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम

शिवलेण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या घारापुरी बेटावरील कायमस्वरूपी वीजपुरवठय़ाचे लोकार्पण गुरुवारी सायंकाळी सहा वाजता होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. लोकार्पण सोहळा ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते, पर्यटन व रोजगार हमी योजना मंत्री जयकुमार रावल, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, ऊर्जा व पर्यटनाचे राज्यमंत्री मदन येरावार आदी उपस्थित राहणार आहेत. न्हावा येथून समुद्रातून सबमरिन पद्धतीची वीजवाहिनी टाकून ही वीज घारापुरीत पोहचण्यात आली आहे.

घारापुरीला वीजपुरवठा करण्याच्या घोषणा गेल्या अनेक वर्षांपासून केल्या जात होत्या. आता वीजपुरवठा सुरू झाल्यामुळे पर्यटकांची संख्या वाढून व्यवसायातही वाढ होणार आहे. वीज नसल्याने घारापुरीमधील जे नागरिक बेट सोडून इतरत्र राहण्यास गेले आहेत. ते पुन्हा एकदा घारापुरी बेटावर परतण्याची शक्यता आहे. घारापुरीवरील सुविधांतही त्यामुळे वाढ होणार आहे. विजेअभावी गेली ७० वर्षे येथील रहिवाशांनी हालअपेष्टा सहन केल्या.

आजुबाजूला दिव्यांचा झगमगाट असताना मध्यभागी असलेल्या घारापुरी बेटावर मात्र प्रदीर्घ काळ अंधार होता. तो दूर झाला आहे.

१६४ ग्राहकांना वीज जोडणी 

घारापुरी बेटाच्या विद्युतीकरणासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागाच्या परवानग्या मिळाल्यानंतर प्रत्यक्षात फेब्रुवारी २०१७ मध्ये या कामाची सुरुवात झाली होती. यात प्रामुख्याने समुद्राखालून साडेसात किमी लांब २२ केव्ही, सिंगल कोअर केबल (३+१ अतिरिक्त केबल) टाकण्याचे काम करण्यात आले आहे. महावितरणमार्फत घारापुरी बेटाला करण्यात आलेला वीज पुरवठा हा पनवेल विभागातील टी. एस. रेहमान या उपकेंद्रातून सुरू आहे. घारापुरी बेटावरील शेतबंदर, मोराबंदर व राजबंदर या तीन वाडय़ांवर प्रत्येकी एक रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) बसवण्यात आले आहे. सध्या १६४ हून अधिक कुटुंबांनी व व्यवसायिकांनी घारापुरी बेटावर वीज जोडणी घेतली आहे.