वाशीतील काळजी केंद्रात ‘एचएफव्ही’ विभाग

नवी मुंबई : करोनाबाधित रुग्णास श्वसनाची मोठी समस्या निर्माण होत असल्याने जलद गतीने ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या उच्च दाबाच्या प्राणवायू विभागाची एक स्वतंत्र व्यवस्था पालिका वाशी येथील कोविड काळजी केंद्रात तयार करणार आहे. श्वास घेण्यास मोठ्या प्रमाणात त्रास होणाऱ्या रुग्णांना या विभागात या एचएफव्ही यंत्राद्वारे ऑक्सिजन पुरवठा केला जाणार आहे. केवळ दोन नाकाच्या नाकपुड्यांनी देण्यात येणाऱ्या या ऑक्सिजनसाठी रुग्णाला श्वास घेण्याची गरज पडत नाही. या यंत्रामुळे हा पुरवठा आपोआप केला जातो. एमजीएम रुग्णालय समूहाला पालिकेने सध्या प्राणवायूचे दहा संच दिले असून आणखी ४० दिले जाणार आहेत. या रुग्णांसाठी वैद्यकीय यंत्रणा ही एमजीएमच्या वतीने पुरवली जाणार आहे, मात्र प्राणवायू पालिकेला एमजीएमने पुरवठा केले आहेत.

कोविड रुग्णाची प्रकृती अत्यवस्थ झाल्यास त्यास शेवटच्या क्षणी श्वास घेण्यास मोठ्या प्रमाणात त्रास होतो. ऑक्सिजनची मात्रा ९४ मिलिमीटर असल्यास रुग्णाला ऑक्सिजन पुरवठा करण्याची आवश्यकता भासते, ९५ ऑक्सिमीटरपेक्षा जास्त रुग्णाच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण योग्य आहे असे मानले जात आहे. पाच ते सहा लिटर ऑक्सिजन पुरवठा केल्यास या रुग्णाला श्वास घेणे शक्य होते, मात्र काही रुग्णांना यापेक्षा जास्त ऑक्सिजन पुरवठा केला तरी त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या रुग्णांसाठी उच्चदाब ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या एचएफव्ही यंत्राची गरज भासत असल्याने पालिकेने ही यंत्राणा उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वाशी येथील सिडकोच्या प्रदर्शन केंद्रातील कोविड काळजी केंद्रात एक वेगळा कक्ष तयार केला जाणार असून या ठिकाणी ही यंत्रणा बसवली जाणार आहे. या यंत्रणेमुळे कोविड रुग्णांचे प्राण वाचण्यास मदत होईल, असा विश्वास प्रशासनाला आहे. गेल्या वर्षीच ही यंत्रणा खरेदी करण्याच्या निविदा काढण्यात आल्या होत्या, मात्र कोविड रुग्णांची संख्या कमी झाल्याने ही निविदा स्थगित करण्यात आली होती ती पुन्हा काढण्यात आली आहे.

नियोजन तसे चांगले पण…

नवी मुंबई पालिकेने वाढत्या रुग्णसंख्येचा सामना करण्यासाठी विविध उपाययोजना केल्या असून अत्यवस्थ, ऑक्सिजन लागणाऱ्या रुग्णांसाठी जास्तीत जास्त रुग्णशय्या उभ्या करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र या सर्व रुग्णशय्यांचे नियोजन मात्र म्हणावे तसे योग्य पद्धतीने होताना दिसत नाही. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. यासाठी एक कॉल सेंटरदेखील उभारण्यात आले आहे, मात्र त्या ठिकाणी निष्णांत वैद्यकीय क्षेत्रातील व्यक्तींची नियुक्ती न करण्यात आल्याने हा गोंधळ जास्त वाढत आहे. त्यामुळे नियोजन तसे चांगले पण वेशीला टांगल्याचे चित्र आहे.

केवळ ४३ अतिदक्षता खाटा शिल्लक

नवी मुंबईतील रुग्णांची संख्या कमी अधिक प्रमाणात वाढत आहे. शहरात घरातच अलगीकरण असलेल्या रुग्णांची संख्या अकरा हजारांच्या घरात गेली आहे. प्रत्यक्षात साडेतीन हजार रुग्ण उपचार घेत आहेत. वाढत्या रुग्णसंख्येसाठी खासगी व पालिकेचे ५०४ रुग्णशय्या या अत्यवस्थ रुग्णांसाठी असून यातील केवळ ४३ रुग्णशय्या शिल्लक आहेत.

विशेष सुविधा असलेल्या रुग्णालयातील अत्यवस्थ रुग्णशय्या तर व्यापून गेलेल्या आहेत. त्यामुळे शहरातील छोट्या मोठ्या रुग्णालयात ५० पर्यंत रुग्णशय्या शिल्लक आहेत. या अतिदक्षता रुग्णशय्यानंतर प्राणवायू आवश्यक असलेल्या रुग्णशय्याची आवश्यकता भासत आहे. पालिकेने खासगी रुग्णालयांच्या माध्यमातून १७४ रुग्णशय्यांची तयारी केलेली आहे. यातील ३९ रुग्णशय्या आजच्या घडीला शिल्लक आहेत. ऑक्सिजनसह असलेल्या रुग्णशय्या या एक हजार ५३० असून यातील २२४ शिल्लक आहेत, तर ऑक्सिजन पुरवठा नसलेले साध्या रुग्णशय्यादेखील ४ हजार ४४१ आहेत.

यातील अडीच हजार रुग्णशय्या खाली असून पनवेलमधील इंडिया बुल्स या इमारतीतदेखील एक हजारपर्यंत रुग्णशय्या अलगीकरणासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.

कामोठे एमजीएममध्ये अत्यवस्थ रुग्णांसाठी १४० खाटा

नवी मुंबई : करोनाचे दैनंदिन रुग्ण वाढत असल्याने आरोग्य व्यवस्था कमी पडू लागली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने अत्यवस्थ रुग्णांसाठी खाटा वाढविण्यावर भर दिला आहे. कामोठे येथील एमजीएम रुग्णालयाबरोबर पालिका प्रशासनाने करार केला असून या ठिकाणी अत्यवस्थ रुग्णासाठी १४० खाटांची तयारी केली आहे. यात अतिदक्षता १०० खाटा व ४० कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या खाटा असणार आहेत. तीन दिवसात त्याठिकाणी ७० खाटांवर प्रवश सुरू करणयत येणार असून २५ एप्रिलपर्यंत सर्व खाटांवर प्रवेश दिला जाणार आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथील आरोग्य व्यवस्थेची पाहणी केली आहे.