ठाणे-बेलापूर मार्गावर अतिक्रमण; वाहतूक कोंडीने नागरिकांची दैना
ठाणे-बेलापूर मार्ग रुंदीकरणाची नागरिक आजवर स्वप्ने पाहात होते. गेल्या आठवडय़ात दिघा येथील रस्त्यांच्या दोन्ही बाजूला असलेल्या दुकानांवर जेसीबी चालवण्यात आला आणि ऐसपैस रस्त्याचे स्वप्न सत्यात येईल, अशी आशा निर्माण झाली; परंतु कारवाईची गाडी तुर्भे स्टोअर ते तुर्भे नाका येथवर आली की, कोंडीमुक्त वाहतुकीच्या स्वप्नांचा पुन्हा चुराडा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
त्यामुळे ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा येथील रस्त्यालगतच्या दुकानांवरील पालिकेच्या कारवाईप्रमाणेच इतर कोंडीच्या ठिकाणी कारवाईची नागरिकांकडून अपेक्षा करण्यात येत आहे. अनेकदा या मार्गावर दुचाकीचालकांना अपघातांना सामोरे जावे लागते. वर्षभरापूर्वी रस्ता ओलांडताना एक महिला आणि तिच्या मुलीला जीव गमवावा लागला होता. त्यामुळे या मार्गावरून चालताना अनेकांच्या पोटात गोळा आला आहे.
ठाणे- बेलापूर मार्गावर तुर्भे स्टोअर ते तुर्भे नाका येथे वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. या मार्गावरून पनवेल आणि ठाण्याकडे ये-जा करणाऱ्या वाहनांची मोठय़ा प्रमाणावर वर्दळ असते. त्यातच एमआयडीसी औद्योगिक क्षेत्रातील विविध कॉर्पोरेट कार्यालयांमध्ये काम करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. सायंकाळच्या वेळेत दुचाकी, खासगी चारचाकी वाहने आणि अवजड वाहनांचा ओघ येथे एकत्र येतो. त्यामुळे परिसरात अभूतपूर्व कोंडीला सामोरे जावे लागते. सध्या दिघा आणि तुर्भे स्टोअर ते तुभ्रे नाका परिसरातील दुकांनांचा रस्तारुंदीकरणात अडसर आहेच, त्यातच नागरिकांना चालण्यासाठी रस्त्याला पदपथ नाही. त्यामुळे नागरिक जीव धोक्यात घालून रस्त्यावर उतरत आहेत.

’ रस्त्यालगत दुकाने, रिक्षा थांबे आणि एका राजकीय नेत्याचे कार्यालय.
’ इंडियन ऑइल पेट्रोलनजीक एमआयडीसीच्या जागेवर रस्त्यालगत इमारत.
’ सविता केमिकल कंपनीनजीक पुलांचे काम सुरू.
’ मार्गावर मासळी विक्रेते, विनापरवाना रिक्षा थांबे, याशिवाय लाकडी साहित्य विक्री दुकाने, गॅस सिलिंडरचे गाळे.
’ रिक्षा, खासगी वाहनचालकांची दिवसाही मनमानी पार्किंग.

ठाणे-बेलापूर मार्गावरील तुभ्रे येथे सध्या तीन पदरी रस्ता आहे. या ठिकाणी स्कायवॉक उभारण्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. स्कायवॉक उभारल्यानंतर स्थानिक नागरिकांना ये जा करण्याकरिता सुलभ होणार आहे. तर रस्तारुंदीकरण या मोहिमेत एमआयडीसीच्या जागेवर अतिक्रमण झाले आहे. त्यावर एमआयडीसीने कारवाई केल्यास कोंडी सुटेल.
अजय संखे, कार्यकारी अभियंता, नवी मुंबई महानगरपालिका