हजारोंना रोजगार; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन होणार

मुंबईच्या ‘ससून डॉक’ मच्छीमार बंदरावरील वाढलेल्या बोटींच्या संख्येमुळे मच्छीमारांचे नुकसान होत असून ते कमी करण्यासाठी उरणच्या करंजा येथे नवे बंदर उभारले जाणार आहे. दहा हजारांपेक्षा अधिक रोजगार देणाऱ्या या बंदरासाठी लागणारे दीडशे कोटी रुपये मंजूर झाले असून चार वर्षांपासून ते रखडले होते. या बंदराचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होण्याची शक्यता आहे.

यामुळे रायगड जिल्ह्यातील किनारपट्टीवर मासेमारी करणाऱ्यांना मुंबईऐवजी जवळच माशांची विक्री करता येणार आहे. तसेच विविध प्रकारचे फायदेही होणार आहेत. या बंदराचे काम मेरिटाइम बोर्डाकडून करण्यात येणार आहे.

समुद्रात मासेमारी केल्यानंतर मच्छीमारांना मासळी विक्रीची सोय असलेले मुंबईतील ससून डॉक हे एकमेव बंदर आहे. या बंदरात मासळीची खरेदी विक्री, सफाई, साठवणूक प्रक्रिया केली जाते. यात महाराष्ट्रासह गुजरात येथील मच्छीमार बोटीतीलही मासळीची विक्री केली जाते.

या बंदरात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष असे १५ ते २० हजार रोजगार उपलब्ध आहेत. ससून डॉकवरील ताण कमी करण्यासाठी २०११ ला करंजा येथे नवे मच्छीमारी बंदर उभारण्यास सुरुवात केली होती. ब्रेक वॉटरचे काम पूर्ण झाल्यानंतर पुढील काम करीत असताना २०१२ साली खडक लागल्याने बंदराच्या कामाच्या खर्चात वाढ होऊन तो ७० कोटीवरून दीडशे कोटींवर पोहोचला आहे. तर मच्छीमार बंदराच्या नियमात बदल होऊन केंद्र व राज्य सरकारच्या हिश्शात ५०-५० टक्केची सुधारणा करण्यात आलेली आहे. वाढीव निधी रखडल्याने बंदरातील काम बंद पडले.

त्यातील केंद्र व राज्य सरकारने निधी उपलब्ध करून देण्यासाठी उरणचे माजी नगराध्यक्ष महेश बालदी यांनी पुढाकार घेतला आहे. बंदराचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे कार्यकारी अभियंता सुधीर देवले यांनी दिली.

कोकणातील मच्छीमारांना फायदा

बंदराच्या निर्मितीनंतर बोटीसाठी लागणारे इंधन, साहित्य देणारे व्यवसाय, साठवणुकीसाठी गोदाम, लिलावासाठी लागणारे कामगार, बोट दुरुस्ती, बर्फ, वाहने, हॉटेल्स, मच्छीची वर्गवारी यांची व्यवस्था असणार आहे. कोकणातील मच्छीमारांना मासेविक्रीसाठी जवळचे बंदर मिळणार आहे. त्यामुळे याची प्रतीक्षा येथील मच्छीमारांना आहे.