शुक्रवार ते रविवारसाठी र्निबध; उद्याने सकाळी ५.३० ते १० पर्यंतच खुली

नवी मुंबई : शहरातील करोना रुग्णांची परिस्थिती गंभीर झाल्याने मुंबई पालिकेप्रमाणे नवी मुंबई पालिका प्रशासनाने मंगळवारी नवे निर्बंधलागू केले. यात शहरातील मॉलमध्ये होत असलेली गर्दी पाहता शुक्रवार ते रविवार तीन दिवस अभ्यागताची करोना चाचणी केल्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे. तर शहरातील उद्याने ही आता सकाळी ५.३० ते १० पर्यंतच खुली ठेवण्यात येणार आहे.

नवी मुंबईत करोनाचे दैनंदिन रुग्ण चारशेपेक्षा अधिक झाले आहेत. रुग्णदुप्पटीचा वेग हा दोन वर्षांवरून चार महिन्यांवर खाली आला आहे. उपचाराधिन रुग्णांची संख्या ही अडीच हजारापर्यंत झाली आहे. ही करोना परिस्थिती गेल्यावर्षीच्या गंभीर परिस्थितीप्रमाणे निर्माण झाल्याने पालिका प्रशासन काही निर्बंधघालत आहे. यापूर्वी लग्न समारंभावर निर्बंधघालत ५० जणांची उपस्थिती बंधनकारक केली आहे, तर राजकीय कार्यक्रमांवरही बंदी घातली आहे. दुकानांच्या वेळा कमी करण्यात येत रात्री दहापर्यंत तर बार अकरा वाजेपर्यंत सुरू राहतील असे आदेश देण्यात आले आहेत. असे असतानाही शहरातील करोना रुग्णांत मोठी वाढ होत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने नवे निर्बंधजाहीर केले आहेत. मॉल, डिपार्टमेंटल स्टोअर्स, उद्याने, बाजार यांच्यासाठी नवी  नियमावली जाहीर केली आहे. शहरातील सर्व उद्याने सकाळी ५.३० ते १० पर्यंतच खुली राहणार आहेत. तर इतर वेळात सर्व उद्याने आजपासून(बुधवार) सकाळी १० नंतर बंद करण्यात येणार आहेत. मॉलमध्ये शुक्रवारी संध्याकाळी ४ नंतर रविवारी रात्रीपर्यंत अभ्यागताची करोना चाचणी करण्यात येणार अहवाल बाधित नसेल तरच प्रवेश दिला जाणार नाही.

शहरात मॉलची संख्या मोठी असून या ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर गर्दी होत आहे. त्यामुळे  प्रवेशव्दारावर प्रत्येक व्यक्तीची प्रतिजन चाचणी करणे बंधनकारक असणार आहे. तसेच अभ्यागताला मागील ७२ तासांमधील ‘आरटीपीसीआर’ चाचाणीचा अहवाल नकारात्मक असल्याचे प्रमाणपत्र सादर केल्याशिवाय मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच गर्दी झाल्याचे आढळल्यास प्रत्येक वेळी रुपये ५० हजार इतका दंड मॉल व्यवस्थापनाकडून आकारण्यात येणार आहे. एका अस्थापनेला दोन वेळा दंड आकारला गेल्यास व तिसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास मॉल पूर्णत: बंद करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. डिमार्ट, रिलायन्स फ्रेश, स्टार बाजार यांसारख्या अस्थापनांना  एका वेळी किती लोक स्टोअरमध्ये उपस्थित राहू शकतील याचा आराखडा तयार करुन त्यानुसार टोकन प्रणाली सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. या नियमांचे पालन झाल्यास मॉलप्रमाणेच या अस्थापनांनाही ५० हजार दंड आकारण्यात येणार आहे. वारंवार उल्लंघन झालयास त्याला टाळे लावण्यात येणार आहेत.  उद्यानांमधील ओपन जीम, ग्रीन जीम, खेळाचे साहित्य हे पूर्णत: बंद राहतील. दैनंदिन व आठवडी बाजारामध्ये मुखपट्टी, सुरक्षित अंतर अशा सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन केले जाणे अनिवार्य करण्यात आले आहे.

शहरातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मॉल, उद्याने, डी मार्ट तसेच शहरातील गर्दीची ठिकाणे यांच्याबाबत नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. शहरात करोनाचा प्रादुर्भाव खूप मोठय़ा प्रमाणात होत आहे. नागरिकांनी करोनाचे नियम पाळावेत अन्यथा यापेक्षाही कठोर निर्णय घेण्यात येणार आहेत. त्यामुळे आगामी टाळेबंदी टाळण्यासाठी शिस्तीचे पालन करुन पालिकेला सहकार्य करावे. -अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका