दुरुस्तीच्या कामामुळे रबाले, ऐरोलीत वाहनांच्या रांगा

नवी मुंबईतून मुंबई, ठाणे या ठिकाणी जाण्यासाठी असलेल्या दोन्ही महत्त्वाच्या प्रवेशद्वारांवर सध्या वाहतूक कोंडीमुळे वाहनचालक त्रस्त आहेत. वाशी खाडी पूल व रबाळे टीजंक्शन या ठिकाणी दुरुस्ती व रस्ते काँक्रीटीकरणाची कामे सुरू आहेत. त्यामुळे सकाळ, संध्याकाळी वाहनांच्या रांगा लागत आहे.

ठाणे-बेलापूर मार्गावरील रबाले ‘टी जंक्शन’ येथे दर वर्षी पावसाळ्यात व इतर वेळीही पाणी साचत असल्यामुळे येथील रस्त्यावर खड्डे पडले होते. तसेच येथील चेंबर तुटल्यामुळे सातत्याने या भागात पाणी साचत होते. यामुळे या ठिकाणी नेहमीच वाहतुकीची मोठी समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे नवी मुंबई महापालिकेने या ठिकाणच्या दुरुस्ती व रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम हाती घेतले आहे.  यामुळे ठाणे-बेलापूर महामार्गावर सकाळी व संध्याकाळी दररोज वाहतूक कोंडी होत आहे. सध्या एका मार्गिकेत काम सुरू असून आणखी तीन आठवडे हे काम सुरू राहणार आहे. त्यामुळे वाहनचालकांना या वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागणार आहे. या कोंडीचा सकाळी कामावर येताना व सायंकाळी घरी जाताना कामगारांना मोठा मनस्ताप होत आहे. सकाळी कार्यालय गाठण्यासाठी व कामावरून सायंकाळी परतताना पुन्हा मोठी वाहतूक कोंडी होते. वाहतूक विभागाने वाहतुकीचे योग्य नियोजन करावे अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

कशामुळे वाहतूक कोंडी?

रबाळे टीजंक्शन येथील कामामुळे वाशीकडून मुंबईकडे जाणारी अवजड वाहने ऐरोली नॉलेज पार्क रस्त्याने वळवण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे मुंबईकडून येणारी वाहने ऐरोली नॉलेज पार्कमार्गे घणसोलीकडे वळवण्यात आली आहे. वाशीकडून ठाणेकडे जाताना ऐरोलीकडे जाण्यासाठी फक्त एकच लेन ठेवलेली आहे. त्यामुळे वसर्व वाहने एकाच वेळी लेनमध्ये शिरत असल्याने रबाले तलाव, रबाळे सिग्नलपर्यंत वाहनांच्या रांगा लागलेल्या असतात.

रबाळे टी जंक्शनजवळ काम सुरू आहे. एका दिशेला सध्या काम सुरू असून दोन्ही बाजूंची कामे पूर्ण करण्यासाठी आणखी तीन आठवडे लागणार आहेत.  – संजय देसाई, कार्यकारी अभियंता