५०० हेक्टर जमीन विशेष आर्थिक क्षेत्रातून वगळण्याची पर्यावरणवादी संघटनांची मागणी

नवी मुंबई</strong> : सिडकोच्या वतीने उरण तालुक्यात २० वर्षांपूर्वी देण्यात आलेल्या विशेष आर्थिक क्षेत्र (एसईझेड) जमिनीत मोठय़ा प्रमाणात पाणथळ तसेच धारण तलावांची (होल्डिंग पॉण्ड) जागा आढळल्याने पर्यावरणवादी संघटनांनी हे क्षेत्र ‘सेझ’मधून वगळण्याची मागणी केली आहे. या क्षेत्रात सुमारे ५०० हेक्टर जमिनीवर पाणथळ वा खारफुटी असल्याचे दिसून येते.

सिडकोने उरण तालुक्यात एक हजार ८०० हेक्टर जमीन ‘सेझ’साठी राखीव ठेवून नंतर त्याची विक्री केली. त्यासाठी नवी मुंबई ‘एसईझेड’ कंपनी स्थापन करून काही उद्योगपतींनी ही जमीन विकत घेतली. मात्र त्यानंतर या जमिनींवर एकही उद्योग उभा राहिला नाही. त्यानंतर ‘एसईझेड’ क्षेत्र मोडीत काढण्यात आले. अनेक एसईझेड रद्द करण्यात आलेले आहेत, मात्र नवी मुंबईतील एसईझेड रद्द होण्याऐवजी जमिनीच्या वापरात बदल करून देण्यात आला आहे. ‘एसईझेड’ कंपनीने विकत घेतलेल्या जमिनीवर अतिक्रमण होऊ नये यासाठी विस्तीर्ण अशी भिंत उभारली आहे. त्यामुळे ही जमीन ‘एसईझेड’ कंपनीच्या मालकीची असून त्यावर प्रकल्पग्रस्तांनाही प्रवेशबंदी आहे.

या जमिनीच्या वापरात बदल करण्यात आल्याने या ठिकाणी ८५ टक्के निवासी इमारती बांधल्या जाणार आहेत. १५ टक्के जमिनीवर वाणिज्यिक संकुले उभारली जाणार आहेत. या बांधकामासाठी सध्या या भागात मोठय़ा प्रमाणात मातीचा भराव टाकण्याचे काम सुरू आहे. नवी मुंबई एसईझेड कंपनीला देण्यात आलेल्या सुमारे दोन हजार हेक्टर जमिनीपैकी ५०० हेक्टर जमिनीवर पाणथळ आणि खारफुटी असल्याचे आढळून आले आहे.

यातील बहुतांशी जमिनीवर पूर्वी मिठागरे आणि मासेमारी केली जात होती. त्यामुळे आजही या जमिनीवर मिठाचे अंश आढळून येतात. डोंगरी आणि पाणजे गावांमधील असलेल्या या क्षेत्राला सिडकोने द्रोणागिरी नोडच्या विकास योजनेत १६ ते २८ सेक्टर क्षेत्राचा आराखडा तयार करण्यात आला आहे. ही सर्व जमीन २००४ मध्ये देशातील एका बडय़ा कंपनीला विकण्यात आल्याचे सिडकोने कोकण पाणथळ तक्रार निवारण समितीला दिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे.

दोन गावांतील ही सर्व जमीन २८९ हेक्टर असून यात १५७ हेक्टर जमिनीवर कांदळवन आहे. या जमिनीवर कोणत्याही प्रकारचे कांदळवन नव्हते असा खुलासा सिडकोचा आहे, मात्र धारण तलाव असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. खाडीकिनारी असलेल्या या नगरीत भरतीचे पाणी येऊ नये यासाठी सिडकोने प्रत्येक नोडच्या बाहेर एक धारण तलाव उभारला आहे. त्यामुळे पावसाळ्यात खाडीतील भरतीचे पाणी शहरात न शिरता ते धाारण तलावात जमा होत आहे.

एसईझेडला विकण्यात आलेल्या या जमिनीच्या क्षेत्रात द्रोणागिरी नोडच्या पश्चिम बाजूस हे धारण तलाव आहेत. सिडकोने एसईझेडची जमीन विकताना धारण तलावाच्या जमिनीही विकल्या का, असा सवाल पर्यावरणवादी संस्थांनी केला आहे.

पामबीच मार्गावरील गोल्फ कोर्सचा मार्ग मोकळा व्हावा यासाठीही येथे पाणथळ जागा नसल्याचे अचानक जाहीर करण्यात आले आहे. या जमिनीवर मोठय़ा प्रमाणात पाणथळ जागा आहेत. देशी-विदेशी अनेक पक्षी येत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने या गोल्फ कोर्सला परवानगी नाकारली आहे. याच जागेतील पाणथळ जमिनी गायब होत असल्याने महामुंबईतील पाणथळ जमिनीचा प्रश्न  ऐरणीवर आला आहे.

पाणथळ जागेत भराव

नवी मुंबईतील खाडीकिनारी बांधकामातील टाकाऊ साहित्याचे (डेब्रिज) ढीग उभारले जात असल्याचे चित्र आहे. याबाबत संबंधित सिडको, महापालिका, वन विभागाने कारवाई करण्याची मागणी पर्यावरणवादी संस्थांनी केली आहे. करावे खाडी परिसरात टी एस चाणक्य परिसरात काही दिवसांपासून पाणथळ जागेत वापरात नसलेले बांधकाम साहित्य टाकले जात आहे. त्यामुळे याबाबत कारवाई करण्याची मागणी पर्यावरणवादी संस्थांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती सुनील अग्रवाल यांनी दिली. यावर पालिकेचे बेलापूर विभाग अधिकारी शशिकांत तांडेल यांनी अशा प्रकारे पाणथळ जागांवर बांधकामातील टाकाऊ साहित्य भराव केले जात असेल तर याबाबत कारवाई करण्यात येईल, असे सांगितले.

महामुंबई क्षेत्रात पाणथळ, कांदळवन जमिनी हडप करण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला जात आहे. पाणजे आणि डोंगरपाडामधील जमिनीत धारण तलावांच्या जागा आहेत. ‘एसईझेड’ला धारण तलावांच्या जमिनी कशा काय विकल्या गेल्या आहेत?

-बी. एन. कुमार, संचालक, नॅटकनेक्ट