अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची अडवणूक
नवी मुंबई : नवी मुंबईतील अतिसंक्रमित क्षेत्रात निर्बंध कायम आहेत. या क्षेत्राच्या चतु:सीमा बंद करण्यात आल्याने अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना बाहेर पडण्याची मुभा पालिकेने दिली आहे. मात्र पोलिसांकडून त्यांची वाहने अडवली जात आहेत.
सोमवारी नवी मुंबईतील टाळेबंदीचे काही नियम शिथिल करण्यात आले, मात्र शहरातील ४२ प्रतिबंधित क्षेत्राच्या सीमा बांबू आडवे टाकून बंद करण्यात आल्या आहेत. या ठिकाणी पोलीस कर्मचारीही तैनात करण्यात आले आहेत.
या निर्बंधांमध्ये पादचाऱ्यांना ये-जा करण्याची सोय आहे, मात्र क्षेत्राच्या सीमेबाहेरून येणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहने अडवली जात आहेत.
प्रतिबंधित क्षेत्रातील नागरिकांसाठी सेवा पुरवण्यासाठी कर्मचाऱ्यांना गरजेनुसार पोहोचावे लागते. यात सामाजिक अंतर आणि टाळेबंदीतील नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली जाते.
सर्वच कर्मचारी दुचाकी वा चारचाकी वाहन सेवा देतात. तरीही पोलिसांकडून अडवणूक केली जात असल्याने अडचणी निर्माण होत आहेत. काही वेळेला पोलिसांशी वाद घालण्याचेही प्रकार घडले आहेत.
अनेकदा प्रतिबंधित क्षेत्रातील बडय़ा राजकारण्यांच्या गाडय़ा फिरताना पोलिसांना त्या कशा दिसत नाहीत, असा सवाल काही कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांनी केला आहे.
‘विशेष सुविधा हवी’
प्रतिबंधित क्षेत्रात अत्यावश्यक सेवा देण्यासाठी कंपन्यांमधील कर्मचाऱ्यांना विशेष सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे. या कर्मचाऱ्यांची वाहने सेवेची मागणी असलेल्या स्थळापर्यंत नेता आली पाहिजेत. तसे निर्देश पालिकेच्या वतीने दिले गेले पाहिजेत, असे रुग्णालयातील एका डॉक्टरने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
कुंपण तोडून प्रवेश
कोपरखैरणे येथे सोमवारी रात्री काही जणांनी प्रतिबंधित क्षेत्राच्या सीमेवरील कुंपण तोडून गाडय़ा निघून गेल्याचा प्रकार घडल्याने अनेकांनी पोलीस कारवाईबद्दल शंका उपस्थित केली आहे.
‘ओळखपत्र दाखवूनही अडवणूक’
स्वच्छता विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याने सांगितले की, एनएमएमटी वा बेस्टच्या गाडय़ांवर अवलंबून राहता येत नाही. कधीकधी रिक्षा मिळत नाहीत. मिळाल्या तर ते अवाजवी भाडे मागतात. हा सारा खर्च परवडत नाही. अशा वेळी स्वत:ची दुचाकी घेऊन कामाच्या ठिकाणी येतो. मात्र, पोलीस अडवतात. ओळखपत्र दाखवूनही बाहेर पडू दिले जात नाही.
पालिका हद्दीतील प्रतिबंधित क्षेत्रातील सर्व सीमा प्रथमच बंद करण्यात आल्या आहेत. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी होत असलेल्या त्रासाबाबत आयुक्तांसोबत होणाऱ्या बैठकीत लवकरच निर्णय घेतला जाईल.
– सुजाता ढोले, अतिरिक्त आयुक्त
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 22, 2020 4:46 am