नवी मुंबई : सुशिक्षित वाहन चालकांपेक्षा कमी शिकलेले वाहन चालकही चांगले वाहन चालवितात असे निदर्शनास आल्याने वाहनचालक परवान्यासाठीची शिक्षणाची अट रद्द केल्याचे केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे स्पष्ट केले.

राष्ट्रीय वाहतूक धोरणात बदल करण्यात आला असून  त्याचा फायदा दहावीपेक्षा कमी शिक्षण घेतलेल्या नागरिकांना होणार असून देशात कमतरता असलेल्या २५ लाख चालकांची उणीव भरून निघणार आहे, असेही गडकरी म्हणाले.

हिंदुस्थान बस ऑपरेटर महासंघाच्या वतीने वाशी येथील सिडको एक्झीबिशन सेंटरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या  ‘प्रवास-२०१९’  या प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी मार्गदर्शनपर भाषणात नितीन गडकरी बोलत होते. प्रदूषण कमी करण्यासाठी देशात यापुढे इलेक्ट्रिक, बायो-सीएनजी आणि इथेनॉल या इंधन वापराला प्राधान्य देण्यात येणार आहे.  नागपूर परिसरात बायो-सीएनजीचे प्रकल्प मोठय़ा प्रमाणात हाती घेण्यात आले आहेत. त्यामुळे विदर्भातील सहा जिल्हे येत्या काही वर्षांत डिझेलमुक्त होणार आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेच्या धरतीवर मुंबई-दिल्ली हा एक्स्प्रेस वे तयार करण्यात येणार आहे. मात्र हा मार्ग इलेक्ट्रिक असणार आहे. त्यामुळे इंधन आणि वेळेत मोठी बचत होणार असून हे अंतर बारा तासांमध्ये वाहनांना पार करता येणार आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.