गर्दीच्या चौकातील बेकायदा पार्किंगला आळा बसणे शक्य

नवी मुंबई परिसरात दिवसेंदिवस बेकायदा पार्किंगची समस्या वाढत असताना ती सोडवण्यासाठी पालिकेने पावले उचलली आहेत. बेलापूर येथील किल्ले गावठाणपासून बेलापूर रेल्वे स्थानका पर्यंतच्या मार्गावर सातत्याने होणारे बेकायदा पार्किंग आणि त्यातून उद्भवणारी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी या परिसरात बहुमजली वाहनतळ उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. हे वाहनतळ ३९ मजल्यांचे असणार आहे.

नवी मुंबई क्षेत्रात असलेल्या आठ विभागांत वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. अनेक ठिकाणी वाहनतळांची सुविधा देण्यात आलेली नाही. त्यामुळे बेकायदा पार्किंगचे प्रमाण मोठे आहे. बेलापूर किल्ले गावठाण चौकाजवळच पालिकेचे मुख्यालय आहे. त्यामुळे या परिसरात वाहनांची सातत्याने वर्दळ असते. तर पामबीच मार्ग हा पुढे बेलापूर स्थानकाकडे जातो. त्यामुळे सेक्टर १५ येथील मुख्य रस्त्यावर सातत्याने वाहनांची वर्दळ असते व वारंवार वाहतूक कोंडी होते. याच परिसरात नवी मुंबईतील सर्वात जास्त हॉटेल्स व बार आहेत. त्यामुळे सायंकाळनंतर या परिसरात वाहनांची प्रचंड गर्दी होते.

या मार्गावर दुतर्फा सम विषम पार्किंग करण्याच्या सूचना आहेत. हॉटेल व बारमध्ये येणाऱ्यांसाठी व्हॅलेट पार्किंगची सोय हॉटेल व बार चालकांकडून देण्यात येते. ही वाहनेही रस्त्यावरच उभी करण्यात येतात. त्यामुळे या परिसरात रात्री दुतर्फा वाहनांच्या रांगा लागतात. याच परिसरात हॉटेल व बार व्यतिरिक्त मोठय़ा प्रमाणात वाणिज्य संकुलेही आहेत.

या संकुलांत येणाऱ्या नागरिकांच्या आणि व्यावसायिकांच्या गाडय़ाही रस्त्यावरच उभ्या केलेल्या दिसतात. सम-विषम पार्किंगच्या नियमांचे उल्लंघन होत असताना, त्याकडे वाहतूक विभागाकडून दुर्लक्ष होत आहे.

ही समस्या सोडवण्यासाठी पालिकेने बेलापूर सेक्टर १५ भूखंड क्रमांक ३९ येथे बहुमजली वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातील प्रस्ताव तयार करून तो मंजूर करण्यात आला आहे. हे वाहनतळ झाल्यास रहिवासी आणि येथे कामानिमित्त येणाऱ्यांची सोय होणार आहे.

‘बेलापूर सेक्टर १५ व परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे पार्किंगची व्यवस्था करण्याची मागणी प्रशासनाकडे वारंवार केली होती. प्रशासनाने प्रथम हा प्रस्ताव ठेवला. नंतरच्या महासभेत प्रस्ताव मंजूर केला. वाहनतळामुळे या विभागातील पार्किंगची समस्या सुटणार आहे,’ अशी माहिती येथील स्थानिक नगरसेवक दीपक पवार यांनी दिली.

या वाहनतळासंदर्भात नवी मुंबई महापलिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही. दरम्यान, या वाहनतळामुळे परिसरातील रहिवाशांचा येण्या-जाण्याचा मार्ग सोपा होणार आहे. परिसरातील वाहतूककोंडी सुटण्याची चिन्हे आहेत.

वाहनतळाचे स्वरूप

* ठिकाण – बेलापूर, सेक्टर १५

* खर्च – २७ कोटी ६६ लाख ३ हजार ६९५ रुपये

* तळमजला – १२१ दुचाकी, ८७ चारचाकी

* पहिला ते चौथा मजला – ४०७ चारचाकी व १२१ दुचाकी