12 December 2019

News Flash

जत्रा हंगामामुळे उरण तालुक्यात उत्साहाला उधाण

खवय्येगिरीसाठी बाजारपेठा सजल्या

खवय्येगिरीसाठी बाजारपेठा सजल्या; देव-देवतांच्या विधी, मिरवणुकांमधून परंपरेचे दर्शन

जगदीश तांडेल, उरण

लांबलेल्या पावसामुळे झालेले पिकांचे नुकसान, त्यानंतर आलेली आर्थिक मंदी आणि व्यवसायातील मरगळ दूर सारून उरण तालुक्यात जत्रांचा हंगाम सुरू झाला आहे. गावोगाव भरणाऱ्या या आनंदमेळ्यांमुळे ग्रामीण अर्थकारणाला गती मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये देवदिवाळीनंतर यात्रांना आरंभ होतो. हीच परंपरा उरणमध्येही पूर्वापार आहे.

ग्राम देव-देवतांची पूजा, विधी आणि मिरवणुका हे या जत्रांचे वैशिष्टय़ असते. जत्रांमध्ये विविध वस्तू, खेळणी तसेच खाद्यपदार्थाचा बाजार भरतो. यात नागरिक खरेदीसाठी बाहेर पडतात. या जत्रांमध्ये सामील होत उरण तालुक्याबाहेरील लोकही खरेदीचा आनंद लुटतात. खाद्यपदार्थाची चव चाखल्यानंतर त्याची खरेदी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडते. काही ठिकाणी मोठय़ा यात्रा भरवल्या जातात. यात भाविक आणि खवय्ये सहभागी होतात.

उरण व अलिबाग परिसरातील नागेश्वर,माणकेश्वर कणकेश्वर येथील यात्रांनंतर आता उरण, पनवेल तसेच रायगड जिल्ह्य़ातील अनेक तालुक्यांतील गावांतील यात्रांना सुरुवात झाली आहे. उरणमधील दत्त जयंतीही जवळच आली असून ही यात्रा तालुक्याची यात्रा म्हणून प्रसिद्ध आहे. यात्रा देव-देवतांच्या असल्याने तरी खालापूर विभागातील बोंबल्या विठोबाची यात्रा ही सुक्या मासळीच्या खरेदीसाठी प्रसिद्ध आहे. अशाच प्रकारे प्रत्येक यात्रेत वेगवेगळ्या वस्तू तसेच खाद्यपदार्थ हे प्रसिद्ध आहेत. सध्या रायगडमध्ये मोठय़ा प्रमाणात नागरीकरण व शहरीकरण होत असताना गावातील यात्रांची प्रथा मात्र कायम आहे.

First Published on November 28, 2019 3:27 am

Web Title: excitement in uran taluka due to the carnival season zws 70
Just Now!
X