सद्यस्थितीत एकमेव काळजी केंद्र; १८२ रुग्णांवर उपचार

नवी मुंबई : करोनाबाधितांचा आधार बनलेले वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रातील एकमेव शिल्लक काळजी केंद्रही पालिकेला बंद करावे लागणार आहे. हे केंद्र सिडकोचे असून ते सिडकोला हवे आहे. त्यांनी पालिकेला दोन वेळा या संदर्भात पत्रव्यवहार केला आहे. मात्र शहरातील सर्व काळजी केंद्रे बंद असून करोनाचे सर्व उपचार या एकाच ठिकाणी एकवटल्याने ते दिल्यास पालिकेची मोठी अडचण होणार आहे.

करोना रुग्ण वाढल्यानंतर पालिकेने वाशी येथील सिडकोच्या प्रदर्शनी केंद्रातील काळजी केंद्र उभारले. या ठिकाणी करोनाकाळात पालिका प्रशासनाने चांगल्या सुविधा पुरवल्याने करोना रुग्ण या काळजी केंद्राला पसंती देत होते. त्यामुळे पालिका प्रशासनाने या ठिकाणी प्राणवायू खाटांसह काही अतिदक्षता खाटा व कृत्रिम श्वसन यंत्रणाही उभारली आहे.  मात्र दिवाळीनंतर करोनाच्या रुग्णांत हळूहळू घट होत गेल्याने पालिका प्रशासनाने हळूहळू शहरातील काळजी केंद्रे बंद केली. सर्व व्यवस्था वाशीतील सिडको प्रदर्शनी केंद्रात केली आहे. या केंद्रासह सद्य:स्थितीत नेरुळच्या डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र हे प्रदर्शनी केंद्र सिडकोचे असून आता ते सिडकोला हवे आहे. त्यांनी पालिका प्रशासनाकडे तशी मागणी केली आहे. या संदर्भात दोन वेळा पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाची मोठी अडचण झाली आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले हे काळजी केंद्र करोना रुग्णांनाही सोयीस्कर आहे.

पालिकेने या ठिकाणी सुमारे १२०० खाटांचे एक रुग्णालयच उभारले आहे. मात्र सिडकोने हे प्रदर्शनी केंद्र चालवण्यासाठी करोनापूर्वीपासूनच ते ठेकेदाराला दिले आहे. त्यामुळे ठेकेदार पालिकेकडे भाडे रक्कम मागत आहे. हे केंद्र पालिकेला जिल्हाधिकारी यांनी दिले असून त्यांच्या आदेशाशिवाय पालिका ते बंद करणार नाही. ठेकेदाराने पालिकेकडे भाडे मागण्याचा संबंध येत नसल्याचे पालिकेचे मालमत्ता विभागाचे उपायुक्त राजेश कानडे यांनी सांगितले. सिडको जनसंपर्क अधिकारी प्रिया रातंबे यांनी प्रदर्शनी केंद्र परत करण्याची मागणी केली असल्याचे सांगितले.

करोनाचे सर्व उपचार वाशी येथील प्रदर्शनी केंद्रात सुरू आहेत. पालिकेने इतर सर्व करोना काळजी केंदे्र बंद केली  आहेत. अत्यवस्थ रुग्णांसाठी डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या केंद्रात सध्या १८२  रुग्ण उपचार घेत आहेत. सिडकोकडून मागणी केली आहे, मात्र ते परत करण्याचा निर्णय घेतला नाही.

– अभिजित बांगर, आयुक्त, महापालिका