घणसोलीत महावितरणच्या हलगर्जीचा फटका

ऐरोली महावितरण विभागाचा भोंगळ कारभार घणसोलीतील चार मुलांच्या मंगळवारी सायंकाळी जिवावर बेतला. सेक्टर-२३ मधील ‘माऊली हाईट्स’ इमारतीतील मुले खेळत असताना त्यांना उच्च दाबाच्या वाहिनीचा धक्का लागला. यात चारही जण गंभीररीत्या भाजले. विद्युत विभागाच्या अकार्यक्षमतेवरून येथील रहिवाशांनी वारंवार तक्रार करूनही संबंधित अधिकाऱ्यांनी कारवाई न केल्याचा आरोप येथील रहिवाशांना केली आहे.

‘माऊली हाईट्स’ या इमारतीलगत अतिउच्च दाबाची वीजवाहिनी आहे. रस्त्यालगत असलेल्या विजेचा खांब आणि अतिउच्च दाबाच्या विद्युतवाहिन्या या धोकादायक स्थितीत आहेत. त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी रहिवाशांनी दोन वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता, मात्र महावितरणने त्याकडे दुर्लक्ष केले होते. दुरुस्ती तातडीने झाली असती तर कदाचित हा प्रकार टळला असता, असे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

विजेच्या धक्क्याने जखमी झालेली मुले सात ते आठ वर्षे वयोगटातील आहेत. मंगळवारी सायंकाळी ६ वाजता खेळताना वाहिनीत स्फोट झाला, अशी माहिती माहिती येथील नागरिकांनी दिली. जखमींतील एक मुलगा १६ टक्के भाजला आहे. त्याला ऐरोलीतील नॅशनल बर्न रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, तर अन्य एकाला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दोन मुलांचे चेहरे भाजले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

हेमांग चंद्रकांत (वय ८), परी बिपिन सिंग (७), सोमन्या पाटील (८) आणि तनिशा चव्हाण (८) अशी जखमी झालेल्या मुलांची नावे असून त्यातील दोन जणांचे चेहरे जळाले असून त्यांच्यावर नॅशनल बर्न हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

माऊली हाईट्स इमारतीच्या पहिल्या मजल्यावर अगदी जवळून अतिउच्च दाबाच्या उघडय़ा तारा गेल्या आहेत. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन याबाबत इमारतीतील रहिवाशांनी दोन वर्षांपासून अनेकदा लेखी तक्रारी विद्युत विभागाकडे दिल्या आहेत. याबाबत महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून तपासणीचा देखावा करण्यात आला. महावितरणच्या हलगर्जीमुळेच मंगळवारी दुर्घटना घडल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. सदर लहान मुलांचे चेहरे जळाले असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर संतप्त रहिवाशांनी बुधवारी ऐरोली येथील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

दुर्घटना कशामुळे?

इमारतीलगत रस्त्यावर विद्युत खांब उभारण्यात आला होता. काही महिन्यांपूर्वी एका भरधाव वाहनाने या वीजखांबाला धडक दिली होती. त्यानंतर हा खांब काढण्यात आला होता. मात्र खांब काढताना त्यावरील वाहिन्यांच्या जोडणीत उणिवा राहिल्याने ही दुर्घटना घडली असावी, अशी शक्यता महावितरण विभागाने व्यक्त केली.

खराब झालेला खांब काढण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी दुरुस्ती करण्यात आलेली नव्हती. याबाबत आम्ही अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्या वेळी शहराचे संपूर्ण काम हाती घेऊन ही कामे केली जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. तसेच वीजवाहिनी इमारतीपासून लांब नेण्याची मागणीही करण्यात आली होती. – डॉ. राजेंद्र पाटील, रहिवासी

येथील रस्त्यालगत असलेल्या विद्युत खांबाला वाहनाच्या धडकेत अपघात झाला होता. त्यामुळे तो खांब काढून टाकण्यात आला होता. त्या वेळी याची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. त्यामुळे तेथील जोडणीत उणीव राहिल्याने वीजवाहिन्यांमध्ये स्फोट झाला. त्याची विद्युत निरीक्षकाकडून पाहणी केली जाईल. – सुरेश जाधव, अतिरिक्त कार्यकारी अभियंता महावितरण