८ दिवसांत ३४२ चालकांवर कारवाई

पनवेल : एसटी महामंडळ व वाहतूक पोलिसांनी गेल्या आठ दिवसांत केलेल्या कारवाईवरून एक्स्प्रेस वे वर एसटी बसचालकांकडून वाहतूक नियमांचे पालन केले जात नसल्याचे समोर आले आहे. मार्गिकेचा नियम तोडल्याने ३४२ बसचालकांवर ई-चलनद्वारे कारवाई करण्यात आली आहे. पुण्याहून मुंबईकडे येताना सर्वाधिक नियमांची पायमल्ली होत आहे. ओव्हरट्रेक करीत वारंवार मार्गिका बदलत हे चालक बस चालवीत होते.

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे महामार्गावर प्रवासी वाहतुकीसाठी खासगी बसप्रमाणे शिवशाही, शिवनेरी, विठाई अशा राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करणारे लाखो प्रवासी आहेत. मात्र काही बसचालकांकडून वाहतूक नियमांचे पालन केले जात नाही. या संदर्भात पोलीस व राज्य परिवहन महामंडळने यापूर्वी अशी मोठी कारवाई केली नव्हती.

पळस्पे महामार्ग वाहतूक पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी राज्य परिवहन महामंडळाला कळंबोली ते खालापूर या द्रुतगती महामार्गाच्या ३० किलोमीटर अंतराच्या पल्ल्यात कारवाई करण्याचे सुचविल्यावर राज्य परिवहन महामंडळाचे मुख्य नियंत्रक तोरो यांनी या प्रस्तावासाठी तातडीने मान्यता दिली. त्यानुसार बसचालकांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस व महामंडळाचे आठ कर्मचारी नेमण्यात आले. दिवसा ही कारवाई करण्यात आली. यामध्ये दुसऱ्या मार्गिकेवरून सर्वाधिक एसटी बसगाडय़ा चालविण्याचे प्रमाण जास्त असल्याचे कारवाईदरम्यान समोर आले. कारवाई ई-चलनने झाल्याने प्रवाशांना कारवाईदरम्यान कोणताही त्रास झाला नाही. मात्र ज्या बसआगारामधील बसगाडय़ांवर कारवाई झाली तेथे कारवाईची माहिती तात्काळ कळविण्यात आली. नियम तोडणाऱ्या प्रत्येक वाहनचालकाला सुमारे २०० रुपये दंड भरावा लागणार आहे.

कारवाईत सातत्य

२३ जानेवारी ते ३० जानेवारी या दरम्यान ही कारवाई करण्यात आली. यापुढेही एसटी बसचालकांवर मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालविणे, मोबाइलवर बोलणे अशा पद्धतीचे नियम तोडणाऱ्यांवर कारवाई सुरू राहील, असे पळस्पे महामार्ग वाहतूक पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी सांगितले.