टोळीतील दोघांना अटक; ३०० हून अधिक जणांना बनावट कागदपत्रांचे वाटप 

नवी मुंबई : आधारकार्डसाठी लागणारी बनावट कागदपत्रे बनवून देणाऱ्या टोळीतील दोघांना अटक करण्यात आली. यातील एक जण दलाल आहे. तर दुसरा बनावट ओळखपत्र तयार करीत होता. आजवर या दोघांनी मिळून ३०० हून अधिक जणांना बनावट कागदपत्रे वितरित केली आहेत. पोलिसांच्या छाप्यात १५ बनावट निवडणूक ओळखपत्रे जप्त करण्यात आली आहेत.

मोहम्मद आझाद (वय २९),  रोहितकुमार यादव (२९) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. यातील मोहम्मद हा माहिती तंत्रज्ञान अभियंता आहे. आधारकार्डसाठी लागणारी बनावट कागदपत्रे बनवून देण्याच्या कामी तो स्वत:कडील ज्ञानाचा वापर करीत होता. त्यासाठी ग्राहक आणून देण्याचे काम यादव करीत होता. बनावट कागदपत्रे तयार करणारी टोळी सक्रिय असल्याची माहिती वाहन शोधपथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांना मिळाली होती.

याआधी यादव याला अटक करण्यात आले होते. त्यानुसार पथकातील एका सदस्याला बनावट ग्राहक म्हणून पाठवले. आझाद याने दीड हजार रुपयांत निवडणूक ओळखपत्र तयार करून दिल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारावर प्रत्यक्ष बनावट कागदपत्रे बनवणाऱ्या मोहम्मद यालाही जेरबंद केले.

यादव हा आधी एका बँकेत एजंट म्हणून काम करीत होता. यादव हा वाशी सेक्टर- १७ येथील आंध्र बँकेच्या आसपास नेहमी उभा राहत होता. बँकेत विविध कामांसाठी आधारकार्ड लागते, मात्र ज्यांच्याकडे आधारकार्ड आणि त्यासाठी लागणारी कागदपत्रे नाहीत. अशांना हेरून तो कागदपत्रांसाठी मोहम्मद याच्याकडे पाठवत होता. मोहम्मद हा केवळ छायाचित्र वा आहे त्याच ठिकाणी मोबाइलवर छायाचित्र घेऊन ओळखपत्राच्या ऑनलाइन प्रणालीत एका दिवसात तयार करून देत होता.

यादव हा मूळ दिल्लीचा असून मोहम्मद हा बोनकोडे येथील आहे. बोनकोडे गावात आझाद एन्टरप्राईजेस नावाचे दुकान असून या ठिकाणी आधारकार्डसाठी लागणारी बनावट कागदपत्रे तयार केली जात होती.

नवी मुंबई आणि पनवेल परिसरात हजारोंच्या संख्येने घुसखोर राहत असल्याचा पोलिसांना वहीम आहे. मात्र त्यांना शोधून काढणे अत्यंत अवघड आहे, अशा व्यक्तींनाही बनावट कागदपत्रे बनवून आधारकार्ड आणि त्याआधारावर अन्य सर्व कागदपत्रे सहज तयार केली जात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

‘पत्ता शोधणे केवळ अशक्य’

हस्तगत करण्यात आलेल्या निवडणूक ओळखपत्रांवरील रहिवास पत्त्यांची छाननी केली. मात्र ओळखपत्रांवरील पत्ते शोधणे अशक्यप्राय असल्याचे पोलिसांनी सांगितले.  एमआयडीसी ठाणे वा फक्त महापे असे पत्ते  ओळखपत्रांवर छापण्यात आले आहेत. नवी मुंबई पालिका निवडणुकीत बनावट कागदपत्रांद्वारे मतदान यादीत स्थान मिळविण्यासाठीही अशा बनावट कागदपत्रांचा वापर केला जाऊ शकतो, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या दिशेने तपास सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. काही वर्षांपूर्वी निवडणूक ओळखपत्रासाठी शिधापत्रिका दाखवली जात होती त्यामुळे बनावट शिधापत्रिका बनवल्या जात होत्या पोलिसांनी सीबीडी येथील अशाच एका छापखाण्यावर धाड टाकली होती. याप्रकरणी एका राजकीय नेत्याचा खासगी स्वीय सहायकासह अन्य एकावर पोलिसांनी कारवाई केली होती.