नवी मुंबई, उरण, पनवेल परिसरातील ट्रेलरचालक, ट्रान्सपोर्ट सुपरवायझर आदी व्यक्तींना पोलीस असल्याची बतावणी करून जबरी चोरी करण्याच्या घटना घडत होत्या. अनेकदा पोलिसांनी नाकाबंदी, टेहळणी करून आरोपीस पकडण्याचा प्रयत्न केला, पण आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जात असे. अखेर नवी मुंबई गुन्हे शाखा २ च्या पोलिसांनी या तोतया पोलिसाच्या मुसक्या आवळल्या. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव पवन खरेतीलाल अरोरा असे आहे.

आरोपी पवन अरोरा हा पुणे येथे राहणारा असून चारचाकीने कर्जतमधील फार्म हाऊसवर येत असे, तेथून दुचाकीवरून नवी मुंबई, पनवेल, उरण या परिसरात येऊन ट्रेलरचालक, ट्रान्सपोर्ट सुपरवायझर या व्यक्तींना पोलीस असल्याची बतावणी करून त्यांच्याकडून मोबाइल फोन, लायसन्स, ओळखपत्रे, रोख रक्कम तसेच ए.टी.एम. कार्ड काढून घेत होता. नंतर दुचाकी प्लसर गाडीवरून पसार होत होता. तर एटीएम कार्डमधून पैसे काढत असताना संशय येऊ नये म्हणून हेल्मेट घालून एटीएममध्ये जात होता. अशा पद्धतीने आरोपी ट्रेलरचालक , ट्रान्सपोर्ट सुपरवायझर यांची फसवणूक करीत होता.

आरोपी पवन अरोरा याच्याविरोधात उरण, पनवेल, तुभ्रे, खारघर पोलीस ठाण्यांत तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पण आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जात असे. अखेर पोलिसांनी आरोपीला शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली.

आरोपी पवन अरोरा यांच्यावर सन २००७ मध्ये एम.पी.डी.ए.प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात २८ गुन्हे दाखल आहेत.

आरोपीने गुन्हय़ांची कबुली दिली असून त्याच्याकडून गुन्हय़ात वापरण्यात येणारी बजाज प्लसर मोटार सायकल, हेल्मेट व कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. अधिक तपास नवी मुंबई पोलीस करीत आहेत.