संतोष सावंत

लॉकडाउनमुळे बाजारपेठा ठप्प झाल्याने शेतकऱ्यांनी पिकवलेला भाजीपाला जनावरांना चारा म्हणून देण्याची वेळ पनवेलमधील शेतकऱ्यांवर आली आहे. जनावरांची यामुळे चंगळ असली तरी शेतकऱ्यांचे मात्र मोठे नुकसान होत आहे. यामुळं काबाडकष्ट करुन पिकवलेल्या भाजीपाल्याला मोलच राहिलेलं नाही, अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून येत आहेत. यामध्ये शासनाने लक्ष घालावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे.

पनवेल तालुक्यातील पूर्वेकडील अनेक गावांमध्ये आजही भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकविला जातो. मिरची, घोसाळे, टोमॅटो अशा भाज्यांचे पीक सांगुर्ली गावातील शेतकऱी मोठ्या प्रमाणावर घेतात. या गावातील शेतकरी शिवाजी पारधी यांनी सांगितले, “बाजारपेठ उपलब्ध नसल्याने आणि मालवाहतूक बंद असल्याने नाशवंत शेतमाल खराब होत आहे. त्यामुळे सुमारे दीडशे किलो घोसाळे आम्ही जनावरांना खाऊ घातले आहेत. तर पाचशे किलो मिरची आजही शेतात पडून आहे.

पनवेल शहरापासून २० मिनिटांच्या अंतरावर हे गाव असल्याने पनवेल शहरांसह वसाहतींमध्ये या शेतकऱ्यांना त्यांचा भाजीपाला विक्रीची योजना सरकारने राबविली आहे. मात्र, प्रत्यक्षात चित्र निराळे असल्याने शेतकऱ्यांवर रडण्याची वेळ आल्याचे पारधी सांगतात. सरकारने आमच्या शेतमालाच्या खरेदी-विक्रीकडे वेळीच लक्ष न दिल्यास लाखो टन शेतमालाचे नुकसान होणार आहे. त्यामुळे हे नुकसान भरुन काढण्यासाठी सरकारने उपाययोजना करायला हव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

पनवेलमधील शेतकऱ्यांचा शेतमाल विक्री करण्यासाठी कृषी विभागाने अनेक योजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र, शेतकरी संघटीत नसल्याने या योजनांचा लाभ त्यांना मिळण्यासाठी अडचणी येत आहेत. काही किलो शेतमाल एका शेतकऱ्याचा असल्याने त्यांनी किमान आठ ते दहा शेतकऱ्यांचा गट बनवून त्यामार्फत शेतमाल विक्रीसाठी कृषी विभागाकडे परवाना मागितल्यास तत्काळ देण्याची सोय विभागाने केली आहे. यासाठी दोन अधिकाऱ्यांची नेमणूक पनवेलच्या कृषी विभागात करण्यात आली आहे. पनवेलमधील पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांसोबत याच कारणामुळे वारंवार बैठका सुरु आहेत. सध्याच्या बिकट परिस्थितीत शेतमालाला योग्य भाव मिळावा त्याची नासाडी होऊ नये, यासाठी आम्ही झटत आहोत, असे कृषी अधिकारी ईश्वर चौधरी यांनी सांगितले. तसेच सांगुर्ली गावच्या शेतकऱ्यांशी आम्ही तत्काळ संपर्क साधला असून त्यांचा प्रश्न तातडीने सोडविण्याचे प्रयत्न विभाग करीत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.