उरणच्या १३ गावांतील ६०० हेक्टर जमीन खाऱ्या पाण्यामुळे नापीक

उरण तालुक्यातील भातशेती ही समुद्र व खाडीकिनाऱ्यावरच असून शेतीचे समुद्राच्या पाण्यापासून रक्षण करण्यासाठी बांधलेले बांध फुटल्याने येथील १३ गावांतील २ हजार ४४२ शेतकऱ्यांची ६०० हेक्टरपेक्षा अधिक शेतजमिनीत पाणी शिरून ती नापीक झाली आहे. २०१२ पासून तहसील कार्यालय व कृषी विभागाने नुकसानीचे पंचनामे करून निधीची मागणी केली आहे. मात्र गेल्या सात वर्षांत ही भरपाई देण्यात आलेली नाही. भरपाई कोणत्या विभागाने द्यायची, हा प्रश्न अद्याप अनुत्तरित आहे.

अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झाल्यास भरपाईची तरतूद आहे. शासनाच्या खारलँड विभागानेही अशीच भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी गेल्या कित्येक वर्षांपासून करत आहेत. या संदर्भात किसान सभेचे रायगड जिल्हा अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे यांनी भरपाईची तरतूद करून, ती तातडीने मंजूर करण्याची मागणी केली आहे. अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. नुकसानाचा अहवाल जिल्हा कृषी विभागाकडे देण्यात आला आहे. २८ लाख रुपयांचा निधी मिळणे आपेक्षित आहे. परंतु हा निधी आजवर मिळालेला नसल्याची माहिती उरणच्या तहसीलदार कल्पना गोडे यांनी दिली.