उरण तालुका हा भातशेतीसाठी प्रसिद्ध असून तीस वर्षांपासून सुरू झालेल्या औद्योगिकीकरणामुळे येथील शेतजमिनींचे क्षेत्रफळ घटत आहे. दुसरीकडे शेतमजुरांच्या संख्येत घट होऊनही त्यांना द्याव्या लागणाऱ्या मजुरीच्या रकमेत वाढ झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे.
उरणमधील पश्चिम विभागात मोठय़ा प्रमाणात औद्योगिकीकरण झाले आहे. त्यामुळे येथील मूळ व्यवसाय असलेली शेती संपुष्टात आली आहे. तालुक्यातील जेएनपीटी या जागतिक बंदरामुळे औद्योगिकीकरणाचा विस्तार होऊ लागला असून तो उरणच्या पूर्व विभागातही वाढू लागला आहे. त्यामुळे शेतीखालील क्षेत्रातही घट होऊ लागली आहे. सध्या उरण तालुक्यातील २६०० हेक्टर जमिनीवर भाताचे पीक घेतले जात आहे. उद्योग आल्याने शेतीवर काम करणारी शेतकऱ्यांची मुलेही नोकरी करीत आहेत. त्यामुळे शेतीवर काम करणाऱ्यांची संख्या आधीच कमी झाली आहे. तर दुसरीकडे पूर्वी एकमेकांच्या शेतात काम करण्याची पद्धतही मोडीत निघू लागली आहे. शेतकऱ्याला आपल्या कामांसाठी आता मजुरांवर अवलंबून रहावे लागत आहे. उद्योगात कंत्राटी पद्धतीची का होईना नोकरी मिळत असल्याने गावातील मजूर विविध कंपनीत नोकरी करीत आहेत. याचा परिणाम मजुरांची संख्या घटण्यात झाला आहे, मात्र उपलब्ध मजुरांनी मजुरी वाढवल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
सध्या उरणमध्ये शेतीकामासाठी दिवसाला ३५० ते ४०० रुपयांची मजुरी मोजावी लागत असल्याची माहिती खोपटा येथील अनंत ठाकूर यांनी दिली. तसेच भातशेतीला योग्य हमी भाव नसल्याने खर्च करूनही शेतकऱ्याच्या हाती काहीच पडत नसल्याचे पुनाडे येथील शेतकरी अनिरुद्ध ठाकूर यांनी सांगितले.