उरण तालुक्यात मान्सूनच्या पावसावर आधारित असलेल्या भाताचे पीक घेतले जात असून मृग नक्षत्रात पावसाच्या सरी येतील या भरवशावर शेतकऱ्यांनी सुक्या बियाण्यांची पेरणी केलेली आहे; मात्र पाऊस लांबणीवर पडल्याने या सुक्या बियाण्यांचे पक्षी आणि पाखरांपासून संरक्षण करण्यासाठी जून्या साडय़ा, ग्रीन नेटचे झाकण देऊन शेतकरी बियाण्यांचे संरक्षण करीत आहेत.
हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात येणाऱ्या अंदाजावर विसंबून राहून अनेक जण पावसाची वाट पाहत आहेत. मात्र मान्सूनचा पाऊस सध्या गोव्यात अडकला आहे. त्यामुळे कोकणासह रायगड जिल्ह्य़ातील भात शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांचे डोळे पावसाच्या आगमनाकडे लागले आहेत.भात शेतीची मशागत करून झालेली आहे. तर अनेक शेतकऱ्यांनी विकत आणून सुके बियाणे शेतात पेरलेले आहे. मागील आठवडय़ात काही मिनिटांसाठी हजेरी लावलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालेला होता. मात्र हा मान्सून पूर्व पाऊस असून मान्सूनच्या पावसाला अजून सुरुवात झालेली नाही. परंतु पाऊस लवकरच येणार असल्याच्या बातम्या झळकल्या, त्यामुळे शेतकरीही आनंदित झाला. असे असले तरी केरळात आलेला मान्सून कोकणा पर्यंत पोहोचण्यासाठी उशीर लागत आहे. त्यामुळे उरण तालुक्यातील भेंडखळ, खोपटे, पाले, पिरकोन, चिरनेर,मोठीजुई, कळंबुसरे, पाणदिवे, आवरे, गोवठणे, जसखार आदी गावांतील शेतकऱ्यांनी मशागत करून केलेल्या सुक्या भाताच्या पेरणीच्या बियाण्यांच्या संरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला आहे.आधीच बेभराशाच्या झालेल्या शेतीसाठी दुबार पेरणी म्हणजे खर्चीक असल्याचे मत आर.एस.म्हात्रे या शेतकऱ्याने व्यक्त केले आहे. त्यामुळे या बियाण्याचे संरक्षण करण्यासाठी शेताच्या बांधावर विविध प्रकारचे झेंडे लावण्यात आलेले आहेत. तसेच घरातील जुन्या साडय़ा या बियाणांवर अंथरून त्यांचे संरक्षण केले जात आहे. त्यामुळेच मान्सून पूर्व का होईना, एकदाचा पाऊस यावा अशी अपेक्षा केली जात आहे.