17 October 2019

News Flash

बाप-लेकाचा वाहतूक शिस्तीचा मूक संदेश

वाहनचालकांना ना वाहतूक पोलिसांची ना सीसीटीव्ही यंत्रणेची भीती अशी परिस्थिती आहे.

रविवारी शहरातील सिग्नलवर एक तास उभे राहून हे बाप-लेक वाहतूक नियम पाळण्याचे आवाहन करीत आहेत.

नवी मुंबई : नवी मुंबईत २०१८ मध्ये वर्षभरात अपघातात २५० जणांना जीव गमवावा लागला आहे. असे असताना वाहनचालकांची बेशिस्तीची बेपर्वाई सुरूच आहे. या बेशिस्त वाहनचालकांच्या डोळ्यात शिस्तीचे अंजन टाकण्याचे काम वाशीत राहणारे सुनील गुप्ता व आदित्य गुप्ता हे बाप-लेक करीत आहेत.

दर रविवारी शहरातील चौकांत सिग्नलवर एक तास उभे राहून वाहतूक शिस्तीचे धडे मूक संदेशाद्वारे देत आहेत. अपघातातून एक कुटुंब जरी वाचले तरी आमच्या या कामाचे सार्थक झाले, एवढाच त्यांचा हेतू आहे.

नवी मुंबई शहरात झपाटय़ाने लोकवस्ती वाढत आहे. परंतु वाहनचालकांच्या बेशिस्तीचे दर्शन चौकाचौकात पाहावयास मिळत आहे.

पामबीचसह ठाणे-बेलापूर तसेच शहरांतर्गत सर्वच मार्गावर बेदरकारपणे वाहन चालवण्याचे प्रमाण अधिक दिसते. वाहनचालकांना ना वाहतूक पोलिसांची ना सीसीटीव्ही यंत्रणेची भीती अशी परिस्थिती आहे.

या बेशिस्तीच्या बेपर्वाईची दखल घेत गुप्ता बाप व लेकांनी हा समाजसेवेचा मार्ग अवलंबला आहे. वाहतूक नियमांविषयी व जीवनाचे महत्त्व सांगणारे फलक घेऊन ते दर रविवारी सुट्टीच्या दिवशी एक तास चौकांत उभे राहत आहेत. ते कोणालाही अडवत नाहीत व नियम सांगण्याचा प्रयत्न करीत नाहीत. सिग्नलवर हातात फलक घेऊन मूकपणे उभे राहत आहेत. हे काम ते गेल्या अनेक महिन्यांपासून करत आहेत. हे संदेश वाचून एकाला जरी वाहतुकीविषयी शिस्त आली तरी ते मोलाचे आहे असे गुप्ता सांगतात.

डोक्यावर सिग्नलचे चित्र काढलेली कागदी टोपी व हातात, लवकर निघा, लवकर पोहचा.. एकदाच मानवी जीवन आहे.., वेगात गाडी चालवू नका.., तुमचे जीवन सुरक्षित करा.. असा संदेश ते देत आहेत.

दर रविवारी सकाळी वाशी विभागातील विविध सिग्नलवर जाऊन आम्ही काही न बोलता, हातात वाहतूक संदेश व डोक्यावर सिग्नलचे चित्र घेऊन उभे असतो. देशभरात दररोज कितीतरी लोक अपघातात मरतात. त्यामुळे आपण समाजासाठी आठवडय़ातील १ तास दिला पाहिजे, या भावनेतून आम्ही दोघे हे करीत असतो. यामुळे एखादे कुटुंब जरी अपघातातून वाचले तरी आम्हाला समाधान आहे.

-सुनील गुप्ता, नागरिक वाशी, सेक्टर १४

First Published on January 12, 2019 1:23 am

Web Title: father son silent message for traffic discipline