नऊ वर्षांनंतर शिक्षा

नवी मुंबई : गर्भलिंग चाचणी प्रतिबंधक कायद्यांतर्गत नऊ वर्षांनंतर वाशी न्यायालयाने एका महिला डॉक्टरला दोषी ठरवत एक वर्षांचा तुरुंगवास आणि २ हजार रुपये दंड ठोठावला आहे. मात्र सदर महिला डॉक्टर ज्या रुग्णालयात काम करीत होती त्या रुग्णालयाबाबत पालिका काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

राज्य आणि केंद्र शासनाने गर्भलिंग निदान चाचणीवर बंदी घातल्यानंतर नवी मुंबईत पालिकेच्या आरोग्य विभागामार्फत तपासणी करण्यात येत होती. यात ८ डिसेंबर २०१२ मध्ये नेरुळ येथील मिलेनियम रुग्णालयात केलेल्या तपासणीत मोठय़ा प्रमाणात अनियमितता आढळून आली. शासनाच्या नियमानुसार रुग्णांची नोंद नसणे, सनद दर्शनी भागात न लावणे, यूजीसीची मूळ प्रत सांभाळून न ठेवणे आदी दहापेक्षा अधिक बाबींत अनियमितता आढळून आली होती. याप्रकरणी संबंधित रुग्णालय आणि डॉक्टर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे प्रकरण ६ ऑगस्ट २०१३ रोजी न्यायालयात दाखल करण्यात आले. यात प्रथम आरोपी म्हणून मिलेनियम रुग्णालय तर आरोपी क्रमांक दोन डॉ. अमिता सुर्वे यांना करण्यात आले होते. नऊ  वर्षांनी याप्रकरणी न्यायालयाने निकाल दिला असून यात आरोपी क्रमांक दोन डॉ. अमिता सुर्वे यांना १ वर्षांचा तुरुंगवास आणि २ हजार रुपये दंड ठोठावला आहे. अशाच प्रकारची नऊ प्रकरणे प्रलंबित आहेत.

रुग्णालयाची पाठराखण

भाजप महामंत्री विजय घाटे यांनी डॉक्टरला शिक्षा देण्यात आली तरी ज्या रुग्णालयात हे सुरू होते ते नामानिराळे राहिले. याला पालिका जबाबदार आहे. दोषारोप पत्र सादर करताना आणि त्यासाठी लागणारी माहिती आरोग्य विभागाकडून देताना रुग्णालय वाचवण्यासाठी दिली की काय अशी शंका त्यांनी व्यक्त केली आहे.

पूर्ण निकालपत्र वाचलेले नाही. यात अमिता सुर्वे दोषी असल्याचे समजले. मात्र रुग्णालय वाचवण्यासाठी काही केले असेल तर ते अयोग्य असून त्याची शहानिशा करून योग्य ती कारवाई केली जाईल.

– अभिजित बांगर, आयुक्त, महापालिका