उरण ते मुंबई जलवाहतूकही बंद
मासेमारीवरील दोन महिन्यांची बंदी उठल्याने मच्छीमारांची लगबग सुरू झाली असून सोमवारपासून मासेमारीच्या नव्या हंगामाला सुरुवात होणार होती. मात्र मागील दोन दिवसांपासून समुद्रात वादळी वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे समुद्र खवळल्याने मासेमारीसाठी समुद्रात जाणे धोकादायक बनल्याने बोटींना समुद्रात सोडण्यात आले नाही. उरण (मोरा) ते मुंबई (भाऊचा धक्का)या दरम्यानची जलवाहतूकही बंद करण्यात आली. शनिवारपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यातच वादळी वारेही वाहू लागले आहेत. त्यामुळे दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर समुद्रात जाणाऱ्या करंजा व मोरा तसेच उरणमधील इतर बंदरातील मासेमारी बोटींवर परिणाम झाला आहे.बोटी मासेमारीसाठी समुद्रात नेण्यासाठी मासेमारांनी सर्व तयारी केलेली होती. परंतु वातावरणात अचानकपणे बदल झाल्याने अनेक बोटी बंदरातच नांगराव्या लागल्या आहेत. असे असले तरी ट्रॉलरच्या बोटी समुद्रात मासेमारीसाठी रवाना झाल्याची माहिती करंजा येथील मच्छीमार मरतड नाखवा यांनी दिली. मोरा व करंजा बंदरातील ४०० पेक्षा अधिक बोटी मासेमारीसाठी समुद्रात गेल्या असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. त्यामुळे येत्या आठवडय़ात बाजारात मासळीची आवक वाढणार असल्याचेही ते यावेळी म्हणाले. तर राज्य सरकारने पर्सिसीन जाळे असलेल्या बोटींना मासेमारीसाठी सप्टेंबरपासूनच परवानगी दिलेली आहे.
त्यामुळे मोरा बंदरात ४०० हून अधिक मासेमारी बोटी उभ्याच असल्याची माहिती मच्छीमारांनी दिली आहे. मत्स्य विभागाकडून देण्यात आलेल्या पर्सिसीन जाळ्यांच्या बोटींची संख्या २०० च्या आसपास असून प्रत्यक्षात मात्र ६०० पेक्षा अधिक बोटी बंदरात असल्याची माहिती महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाचे मोरा बंदर अधिकारी ए. एन. सोनावणे यांनी दिली आहे.
त्याच प्रमाणे सोमवारपासून अचानकपणे वातावरणात बदल झाल्याने मोरा ते मुंबई दरम्यानच्या स्पीड व साध्या बोटींची सेवा सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आल्याची माहिती त्यांनी यावेळी बोलताना दिली. मोरा येथील जलवाहतूक बंद करण्यात आली आहे.