एकतर्फी निवडणूक; पदरमोड करून प्रचार करण्याची परंपरा मोडीत

नवी मुंबईतील दोन्ही मतदार संघात होणाऱ्या लढती ह्य़ा लुटुपुटुच्या असल्याने प्रमुख पक्षातील उमेदवारांना निवडणूक खर्चापेक्षा कराव्या लागणाऱ्या अतिरिक्त खर्चाची बचत झाली आहे. दोन्ही मतदार संघातील भाजपच्या उमेदवारांसमोर लढत देणारा आघाडीचे उमेदवार हे तगडे उमेदवार नसल्याने भाजपच्या उमेदवारांनी विजयाची खात्री आहे. मताधिक्य किती मिळणार हाच खरा प्रश्न असल्याने दोन्ही उमेदवारांनी खर्चात हात आखडता घेतला आहे. यापूर्वीच्या दोन निवडणुकीत या ठिकाणी पैशांचा पाऊस पडल्याचे दृश्य होते.

नवी मुंबईतील ऐरोली मतदारसंघात भाजपा शिवसेना महायुतीचे गणेश नाईक उमेदवार आहेत, तर त्यांचा सामना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे गणेश शिंदे करणार आहेत. यात मनसेचे निलेश बाणखेले  नशीब आजमवणार आहेत. ही दुरंगी लढत अतिशय किरकोळ होण्याची शक्यता आहे. नवी मुंबईतील माथाडी कामगारांच्या बळावर शिंदे निवडणूक रिंगणात उतरले असून माथाडी कामगार संघटना भाजप आणि राष्ट्रवादीत विभागली गेली आहे. त्यामुळे या कामगारांची मतेदेखील विभागली जाणार आहेत.

तगडा उमेदवार नसल्याने नाईकांचा अतिरिक्त खर्च वाचला आहे. हीच स्थिती बेलापूर मतदार संघात झाली आहे. म्हात्रे यांच्या समोर पश्चिम महाराष्ट्रातील मतदारांच्या जोरावर उभे राहिलेले नगरसेवक अशोक गावडे हे तीन वेळा आमदार राहिलेल्या मंदा म्हात्रे यांच्या समोर तसे प्रभावी उमेदवार नाहीत. त्यामुळे म्हात्रे यांचाही होणारा अतिरिक्त खर्च वाचला असून निवडणूकीतील घोडेबाजाराला लगाम बसला आहे.

राष्ट्रवादीकडून तगडा उमेदवार नाही

गणेश नाईक यांच्या समोर एका कामगार संघटनेच्या स्थानिक नेत्याला उभे करुन राष्ट्रवादीने अगोदरच कच खाल्ली आहे. त्यामुळे नाईकांचा प्रत्येक निवडणुकीत करावा लागणारा मोठा खर्च वाचला आहे. भाजप, संघ आणि मुख्यमंत्री पातळीवर प्रचाराची धुरा सांभाळली जात असून उमेदवारांना प्रचाराची दिशा ठरवून दिली जात आहे. त्यामुळे पदरमोड करून प्रचार करण्याचे दिवस सरले असल्याची चर्चा आहे.