गणेश नाईकांचा आरोप; मुख्यालयासमोर आंदोलनाचा इशारा

नवी मुंबई : प्रारूप प्रभाग मतदार यादीत मतदारांच्या नावांची अदलाबदल झाल्याचा संशय व्यक्त करीत आमदार गणेश नाईकांनी आता थेट यात आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. मतदार यादीत नावांत फेरफार करण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनी प्रत्येकी पाचशे रुपये घेतल्याचा आरोप त्यांनी केला असून यावर योग्य कारवाई न केल्यास पालिका मुख्यालयासमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

या मतदार यादीवर सर्वच राजकीय पक्षांनी संशय व्यक्त केला आहे. सोमवारी मुंबईत आमदार व नवी मुंबई प्रभारी आशीष शेलार यांनी मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी संगनमत करून नवी मुंबईत प्रारूप मतदार याद्यांत फेरफार केल्याचा आरोप करीत या प्रकाराची ‘एसआयटी’मार्फत चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. बुधवारी गणेश नाईकांनी पालिका आयुक्तांची विकासकामांबाबत भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना यात थेट आर्थिक व्यवहार झाल्याचा आरोप केला आहे. प्रभाग ७७ मध्ये अनेक नावे नव्याने टाकली तर अनेक नावे वगळली आहेत. याबाबत दशरथ भगत यांनी पुरावे सादर केले आहेत. पालिकेच्या अधिकाऱ्यांनी ५०० रुपये खोटे नाव टाकण्यासाठी घेतल्याची माहिती मला मिळाली आहे. यावर कारवाई केली नाही तर पालिका मुख्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असे या वेळी त्यांनी सांगितले.

घोळ कोणी घातला?

मतदार याद्यांचे काम महसूल विभागामार्फत केले जाते, पालिकेतर्फे नाही. इतकी वर्षे मंत्री राहिलेल्या नाईकांना हे माहिती हवे. मतदार याद्यांत ४० ते ५० हजार नावांचा घोळ कोणी घातला हे नवी मुंबईकरांना चांगलेच माहिती आहे. मतदार यादीत नावे टाकण्यासाठी लागणाऱ्या साहित्यासहित कोणाचे कार्यकर्ते पकडले होते हेसुद्धा नवी मुंबईकरांनी पाहिले असल्याचे शिवसेना उपनेते विजय नाहाटा यांनी सांगितले.