नवी मुंबई : पुणे येथे पोलीस मोटार वाहन विभागात कार्यरत असलेले अप्पर आयुक्त निशिकांत मोरे यांच्या विरोधात तळोजा पोलीस ठाण्यात विनयभंगचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मोरे यांच्या मित्रानेच संबंधित तक्रार दाखल केली आहे.

मोरे यांचे मित्र खारघर परिसरात राहतात. त्यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात मोरे सहकुटुंब सहभागी झाले होते. या वेळी मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य मोरे यांनी केले. आपले वडील आणि भावाने त्यांना अडवण्याचा प्रयत्नही केला होता, अशी माहिती पीडित मुलीने पोलिसांना दिली.

५ जून रोजी ही घटना घडली. मात्र, या बाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून घेतली जात नसल्याचा आरोप होत होता. या बाबत पीडित मुलीच्या वडिलांनी नवी मुंबईच्या आयुक्तांशी संपर्क साधल्यावर या प्रकरणाची खात्री करून निशिकांत मोरे यांच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे, अशी माहिती तळोजा पोलीस ठाण्याचे व.पो.नि. काशिनाथ चव्हाण यांनी दिली.