नवी मुंबई : कोपरखैरणे येथे थाटामाटात उद्घाटन करण्यात आलेले अग्निशमन केंद १८ दिवसांनंतरही सुरूच झाले नाही. संपर्क साधण्यास अद्याप दूरध्वनीही बसवण्यात आला नाही. केवळ आचारसंहितेच्या आत उद्घाटन करण्याचा अट्टहास कशासाठी? असा सवाल कोपरखैरणेतील रहिवासी करीत आहेत.

वाशीनंतर थेट ऐरोली आणि एमआयडीसी क्षेत्रात पावणे येथे अग्निशमन केंद्र आहे. त्यामुळे रबाले गोठीवली, तडवली, बोनकोडे, खैरणे, घणसोली, कोपरखैरणे, महापे या परिसरात आगीची घटना घडली तर वाशी वा ऐरोली अग्निशमन केंद्रावर अवलंबून राहावे लागते. कोपरखैरणे, घणसोली परिसारात आग लागल्यावर त्या ठिकाणी पोहचण्यास वाशी वा ऐरोली अग्निशमन दलास वाहतूक कोंडी भेदून येण्यासाठी किमान अर्धा तास लागतो. तोपर्यंत आग उग्ररूप धारण करीत सर्व भस्मसात करते. नुकतेच कोपरखैरणे सेक्टर १९ खाडीकिनारी लागलेल्या झोपडपट्टीतील आगीचे उदाहरण ताजे आहे.

त्यामुळे कोपरखैरणे सेक्टर दोन येथे सिडकोने भूखंड उपलब्ध करून दिला आहे. अतिक्रमणे हटविल्यानंतरच भूखंड ताब्यात घेण्याची भूमिका घेतल्याने यात तीन वर्षे गेली. अखेर सिडकोने पालिकेच्या मदतीने अतिक्रमण हटवले. त्यानंतर हे केंद्र उभे राहण्यास चार वर्षांचा कालावधी लागला. या प्रवासानंतर येथे इमारत उभी राहिली असून त्यासाठी दोन गाडय़ाही घेण्यात आल्या आहेत. आठवडाभरापूर्वी मोठा गाजावाज करीत या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. मात्र अद्याप येथे ते सुरूच झाले नाही.

याबाबत महापौर जयवंत सुतार यांनी कर्मचारी नसल्याने ते सुरू करण्यात आले नाही. भरती प्रक्रिया सुरू आहे. काही दिवसांत हे केंद्र पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येईल असे सांगितले. मात्र, अजून किमान दोन ते तीन महिने हे केंद्र सुरू होऊ  शकत नाही असे खाजगीत अधिकारी वर्ग सांगत आहेत.

उद्घाटने, भूमिपूजनांची लगीनघाई थांबली

दाखवण्याचा प्रयत्न झाला. ऐरोली येथे झालेल्या उद्घाटनांमध्ये तर राजकीय आकसापोटी श्रेयवाद उफाळून आल्याचे पाहावयास मिळाले. पालिकेने जवळजवळ १५ महत्त्वपूर्ण कामांचे उद्घाटन व काहींचे भूमिपूजन केले आहे. तर नरसेवकांनी जवळजवळ या १० दिवसांत २५ लाखांखालील विविध कामांचा श्रीगणेशा केला आहे. आचारसंहिता लागणार म्हणून पालिकेने महासभा व स्थायी समितीमध्ये जवळजवळ १३० कामांचे व कोटय़वधींचे प्रस्ताव मंजूर केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

विभागाची मोठी गरज

या अग्निशमन केंद्रासाठी ६ हजार लिटर क्षमतेच्या एक्स टेंडर आणि २ हजार ५०० लिटर क्षमतेच्या मिनी टेंडर या अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल झाल्या आहेत. मात्र त्या सध्या पडून आहेत. ५ हजार २०० चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर सर्व सुविधांची पूर्तता करणारी ही इमारत सज्ज आहे. या केंद्रानंतर अग्निशमन दल सक्षम होण्यास मदत होणार आहे.