ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा एमआयडीसी परिसरात गेल्या १५ वर्षांपासून बंद असलेल्या अम्ब्रेका कंपनीला मंगळवारी दुपारी एकच्या सुमारास भीषण आग लागली. ही कंपनी बंद असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी कंपनीतील भंगार मात्र जळून खाक झाले आहे. तीन आठवडय़ांपूर्वीदेखील या कंपनीला आग लागली होती.

[jwplayer CdTbNsE8]

ऐरोली आणि रबाळे येथील अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेऊन तीन तासांत आगीवर नियंत्रण मिळवले. आगीचे लोट ठाणे-बेलापूर मार्गावरून दिसत होते. या कंपनीत नटबोल्ट बनविण्यात येत. काही कारणास्तव ही कंपनी बंद पडली. १५ वर्षांपासून कंपनी बंद असल्याने तिथे गवत आणि झाडे वाढली आहेत.  कंपनीच्या मालकाचे याकडे लक्ष नाही. कंपनी बंद झाल्यानंतरही तिथे काही साहित्य होते. मात्र कंपनीने सुरक्षारक्षक तैनात न केल्याने हे साहित्य चोरटय़ांनी लंपास केले. त्यामुळे भंगार माफियांनी आग लावल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.

मंगळवारी दुपारी १च्या सुमारास कंपनीच्या आतील बाजूने धूर येऊ लागल्याचे रहिवाशांच्या निदर्शनास आले. याची माहिती स्थानिक रिक्षाचालक तसेच व्यापाऱ्यांनी ऐरोली अग्निशमन विभागाला दिली. आत रबरचे साहित्य असल्याने त्याचबरोबर सुकलेल्या गवताने पेट घेतल्याने आग अधिकच भडकली. ऐरोली व रबाळे येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन तीन तासांनंतर आग विझविली.

भंगार चोरांवर संशय

गेल्या अनेक वर्षांपासून बंद असलेल्या कंपनीत भंगारचोर चोरी करतात. अनेक वेळा या चोरांना रबाळे पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. कंपनीचे मालक लक्ष देत नसल्याने भंगारचोरांचे फावले आहे. त्यामुळे उरल्यासुरल्या भंगारवरही डल्ला मारण्यासाठी त्यांनीच आग लावली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

[jwplayer PuSvtqP8]