18 January 2019

News Flash

रेल्वे स्थानकांत आगीशी खेळ

सिडको मात्र रेल्वे स्थानकांतील स्टॉलचालकांना केवळ नोटीस बजावून स्वस्थ बसली आहे. 

 

नियम धाब्यावर बसवून खाद्यपदार्थ शिजवणाऱ्यांकडे सिडकोचे दुर्लक्ष

रेल्वे स्थानकांमध्ये केवळ तयार खाद्यपदार्थ विकण्याची परवानगी असताना, नवी मुंबईतील स्थानकांत खुलेआम अन्न शिजवण्यात येत आहे. मुंबईतील कमला मिल येथील अग्नितांडवानंतर सुरक्षेच्या कारणास्तव संपूर्ण नवी मुंबईत हॉटेल, पबवर अग्निसुरक्षेसंदर्भात कारवाई सुरू असताना सिडको मात्र रेल्वे स्थानकांतील स्टॉलचालकांना केवळ नोटीस बजावून स्वस्थ बसली आहे.

नवी मुंबई शहरातील अनेक रेल्वे स्थानकांत खाद्यपदार्थ विक्रेते सिडकोच्या नियमांची पायमल्ली करत आहेत. सिडकोने १० स्थानकांतील गाळे भाडेकरारावर दिले आहेत. या गाळ्यांमध्ये कोणत्या कृतींवर बंदी आहे, याबाबतची नियमावली आहे, मात्र विक्रेते आणि दुकानदारांनी ती धाब्यावर बसवली आहे. ऑफिससाठी जागा घेतल्याचे दाखवून त्या जागेत मद्यविक्री दुकाने, बार, हॉटेल्स थाटण्यात आले आहेत. अनेक स्थानकांत खुलेआम टेबल-खुच्र्या मांडून जागा अडवण्यात आली आहे.

१९९७-९८ पासून या गाळ्यांची विक्री करण्यात आली आहे किंवा ते भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. सिडकोने भाडेतत्त्वावर दिलेले गाळे हे बहुतांश तळमजला वगळून दिले आहेत. परंतु तळमजल्यावर गाळा मिळालेल्यांपैकी अनेक व्यावसायिकांनी दुकानाबाहेरचा परिसर आपलाच समजून हॉटेल व फास्टफूडचे व्यवसाय थाटले आहेत. त्यात रोज अन्नपदार्थ शिजवले जातात. त्यासाठी सिलिंडरचा वापर केला जातो. गर्दीच्या ठिकाणी असलेल्या या सिलिंडरचा स्फोट झाल्यास किंवा अन्न शिजवताना आग लागल्यास दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. जागेचा वापरबदल केल्यामुळे अग्निशमन विभागाच्या परवान्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एखादी दुर्घटना घडल्यास हजारो प्रवाशांचा जीवही धोक्यात येण्याची भीती आहे.

रेल्वे स्थानकातील बेकायदा व्यवसायांबाबत सिडकोला कारवाईचे पत्र दिले आहे. विविध स्थानकांत बेकायदा हॉटेल व्यवसाय सुरू आहेत. सिडको दुर्घटनेची वाट पाहत आहे का? फक्त नोटीस पाठवून काय होणार? बेकायदा व्यवसाय  राजरोस सुरू आहेत, अशी टीका मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी केली.

स्थानकात या व्यवसायांना बंदी

मद्य्विक्री, मांस-मासेविक्री, रेस्टॉरंट व फुड स्टॉल, पानगादी, भंगारविक्री,बांधकाम हार्डवेअर दुकान, ऑटो वर्कशॉप, प्रिंटिंग प्रेस, सिमेंट व धूळनिर्मितीची शक्यता असणारे व्यवसाय, फर्निचर, स्टील फॅब्रिकेशन, रायायनिक प्रयोगशाळा, पिठाची चक्की.

सुका खाऊ आणि तयार खाऊ  विकण्यास परवानगी आहे. नियम मोडणाऱ्या व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या आहेत. सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या निर्देशानुसार आठवडाभरात ठोस कारवाई करण्यात येणार आहे. कमला मिल सारखी घटना घडू नये, यासाठी सिडको गंभीर आहे. लवकरच याबाबत ठोस निर्णय होणार आहे.

फैय्याज खान, इस्टेट विभाग, सिडको

First Published on January 12, 2018 1:46 am

Web Title: fire safety issue in navi mumbai railway station food stall cidco