आग लावणाऱ्यांकडे तहसील आणि वन विभागाचे दुर्लक्ष

कांदळवन (खारफुटी) संरक्षणासाठी शासनाकडून खास उपाययोजनाही केल्या जात असताना उरणमधील खाडीकिनाऱ्यांवर कचरा टाकून येथील खारफुटी जाळण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा घटना वारंवार घडत असताना खारफुटीच्या संरक्षणाची जबाबदारी असलेल्या वन विभाग व तहसील कार्यालयाकडून दुर्लक्ष होत आहे. उद्योगांसाठी खारफुटी नष्ट करण्याची परवानगी पर्यावरण विभाग देत असल्याने आधीच कमी होत असलेल्या खारफुटीचे क्षेत्र झाडे जाळण्यात येत असल्यामुळे खारफुटीचा पट्टा आणखी कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

उरण समुद्रकिनारी असल्यामुळे खारफुटीचे प्रमाण अधिक आहे. याच परिसरात खाडीकिनाऱ्यावर उद्योग उभारले जात आहेत. त्यासाठी खारफुटीवर मातीचा भराव टाकून ती नष्ट केली जात आहे. केंद्रीय पर्यावरण विभागाने नष्ट केलेल्या खारफुटीच्या मोबदल्यात इतरत्र खारफुटीचे रोपण करण्याची अट घातली आहे. मात्र सध्या उरणच्या करंजा, मोरा, खोपटा आदी खाडीकिनाऱ्यांवरील खारफुटींवर मोठय़ा प्रमाणात कचरा टाकण्यात आल्यामुळे या परिसराला कचराभूमीची अवकळा आली आहे. कचरा नष्ट करण्यासाठी आग लावून त्यात खारफुटीही जाळली जात आहे.

उरणमधील काही गावांतील कचरा या परिसरात टाकला जात असून दोन दिवसांपूर्वी या संदर्भात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही.

बी. डी. गायकवाड, वन संरक्षक, उरण

खारफुटीच्या संरक्षणाची जबाबदारी आमच्या विभागाचीही आहे.  पाहणी करून हा कचरा खारफुटीवर टाकून कोण जाळत आहे, याची माहिती घेऊन कारवाई करण्यात येईल.

कल्पना गोडे, तहसीलदार, उरण